ई स्टोअर इंडियामध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांची मालवण पोलीस ठाण्यात धाव

मनसे प्रदेश सचिव, माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती ; जवळपास ८० जणांकडून तक्रारी दाखल

मालवण तालुक्यातील सुमारे १५ ते २० कोटी तर जिल्ह्यातील १०० कोटी रुपये अडकून : माजी आ. उपरकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

ई स्टोअर इंडिया मध्ये फसवणूक झालेल्या मालवण तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारी मनसेचे प्रदेश सचिव, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन घेतली. या नागरिकांच्या तक्रारी नोंदवून ई स्टोअरच्या सर्व वरिष्ठांशी चौकशी करून कारवाई करावी. तसेच फसवणूक करणाऱ्या कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी योग्य कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ई स्टोअर मध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांना दिले. याप्रकरणाची जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सांगितले. ई स्टोअर इंडिया मध्ये मालवण मधील नागरिकांचे सुमारे १५ ते २० कोटी तर जिल्ह्यातील नागरिकांचे सुमारे १०० कोटी रुपये अडकून असल्याचे माजी आ. उपरकर यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे अमित इब्रामपूरकर, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदिप लाड, विशाल ओटवणेकर, उदय गावडे, तुषार जुवेकर, प्रशांत पराडकर यांच्यासह फसवणूक झालेले नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, इस्टोअर फसवणूकप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दिलेल्या पत्रानुसार अर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे चौकशी सुरू झाली होती. व त्यांच्याकडून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे यांना पत्र पाठवून तक्रारीची माहिती घेण्यास सांगितली होती. त्यावेळी फसवणूक झालेल्या ठेवीदारांना कंपनीचे वरिष्ठ यांनी सर्व एजंट व त्यांच्या प्रमुखांना पैसे येणार असे सांगितले होते. ९९९ रुपये भरून अकाऊंट टॉपअप करा असे सांगितले जात होते. परंतु अद्यापही ईस्टोरच्या ग्राहकांना व ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत.

ई-स्टोरमध्ये फसवणूक झालेल्या मालवण तालुक्यातील ईस्टोअरच्या ८० ग्राहकांनी मनसे कार्यालय येथे उपलब्ध फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तक्रारी दिल्या आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात, असे उपरकर यांनी सांगितले. यावर या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती राज्य आणी देशपातळीवर असल्याने पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच ईस्टोअरमध्ये ज्यांची फसवणूक झालेली आहे. अशा नागरिकांनी मालवण पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबतची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ई स्टोअर मधील पैशातून प्रॉपर्ट्यांची खरेदी

ई स्टोअर मधील प्रमुख अधिकाऱ्यांनी नागरिकांनी गुंतवलेल्या पैशातून मालवणसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रॉपर्ट्यांची खरेदी केली आहे. या प्रॉपर्ट्या विक्री करण्यापासून त्यांना मज्जाव करावा, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे. तसेच जिल्ह्यात आणखी काही कंपन्याकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!