मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला मिळणार चालना ; सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव
भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पाठपुरावा
केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर यांचे लक्ष वेधले
ना. राणे यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना पत्र ; आ. कालिदास कोळंबकर यांचीही सकारात्मक चर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेल्या येथील मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अनेकदा येथे येणाऱ्या कलाकार आणि नाट्य रसिकांची गैरसोय होते. या नाट्यगृहाची डागडुजी करण्यासाठी अनेकदा कलाकारांकडून मागणी करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या नाट्यगृहाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला चालना मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. नाट्यगृहाच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी सुमारे ४.१० कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवण्यात आले असून या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला निधी मिळण्यासाठी श्री. पाटकर यांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा आमदार नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर यांचे लक्ष वेधले आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर ना. नारायण राणे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. तर आ. कालिदास कोळंबकर यांनी विधानभवनात ना. मुनगंटीवारांशी चर्चा करून मामा वरेरकर नाट्यगृहाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला ना. मुनगंटीवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मालवण नगरपालिकेच्या वतीने सन २००६ मध्ये सिंधुदुर्गातील पहिले सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. आज जवळपास १७ वर्षे उलटली तरी या नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आली नाही. आज या नाट्यगृहाला गळती लागली असून आतील खुर्च्या आणि पंख्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे अनेकदा येथे नाट्य प्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. पालिकेच्या वतीने येथे नवीन इमारत उभी करण्यात आली. पण नाट्यगृहाच्या मूळ इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नाट्यगृहाची ही दुरावस्था दूर करण्यासाठी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी पुढाकार घेतला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा आमदार नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर यांचे नाट्यगृहाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधून याच्या नूतनीकरणााठी निधी देण्याची मागणी केली आहे.
ना. नारायण राणेंचे सुधीर मुनगंटीवारांना पत्र ; तर कालिदास कोळंबकर यांची चर्चा
दीपक पाटकर यांनी मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या नाट्यगृहाला अपेक्षित असलेला ४.१० कोटींचा निधी तात्काळ मंजूर करावा, अशा मागणीचे पत्र ना. राणे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी सुद्धा हा निधी देण्याकरिता ना. मुनगंटीवार यांच्याशी विधानभवनात चर्चा केली. त्यामुळे नाट्यगृहाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोई सुविधांनी युक्त असे ९५० आसनक्षमता असलेले मालवण नगरपरिषदेचे नाट्यगृह सन २००६ पासुन नाट्यप्रेमींसाठी उपलब्ध झालेले आहे. या नाट्यगृहात दरवर्षी अनेक नामवंत कलाकारांची नाटके, जादुचे प्रयोग, ऑर्केस्ट्रा, नाट्यस्पर्धा असे राज्यस्तरावरील कार्यक्रम आणि स्थानिक शासकिय / खाजगी कार्यकृत मोठ्या संख्येने होत आहेत. मागील सुमारे १७ ते १८ वर्षांच्या नियमीत वापरामुळे नाट्यगृहातील अंतर्गत यंत्रणा, खुर्च्या, विदयुत / ध्वनी यंत्रणा निकामी झालेल्या असुन इमारतीचे लोखंडी छप्पर / पत्रे आणि इतर भाग कमकूवत झालेले आहेत. याकरिता या इमारतीची दुरुस्ती करुन काही यंत्रणा अद्ययावत करणे आवश्यक आहे. मालवणची नाट्यसंस्कृती आणि सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असे हे नाट्यगृह जतन करण्यासाठी आणि जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार नाट्यगृह उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असलेला ४ कोटी १० लाखाचा निधी नगरपरिषदेला मंजुर करुन मिळावा अशा मागणीचे निवेदन दीपक पाटकर यांनी सादर केले आहे.