भाजपाकडून राज्यातील ७० जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर ; सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत
नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील : प्रदेशाध्यक्षांकडून विश्वास व्यक्त
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टीने राज्यात संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. सावंत हे यापूर्वी जिल्हा कार्यकारणीवर संघटन सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांना आता बढती देण्यात आली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रभाकर सावंत यांच्या नावाची चर्चा असली तरी प्रत्यक्षात या पदावर कोणाला संधी मिळणार ? याकडे ठेऊन लागून राहिले होते. अखेर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रभाकर सावंत हे उत्तम संघटक म्हणून ओळखले जातात.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.
सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!चंद्रशेखर बाबनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा