एका व्हिडीओने कोण संपत नसतो … येत्या काळात किरीट सोमय्या ठाकरे गटासाठी भयानक ठरणार !

भाजपा नेते निलेश राणे यांचा इशारा ; अजित पवार गटावरही साधला निशाणा

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

एका कथित व्हिडीओ क्लिपमुळे वादात सापडलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे. यावरून भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाला फटकारलं आहे. एका क्लिपमुळे कोणी संपत नसतो. येणाऱ्या काळात किरीट सोमय्या ठाकरे गटासाठी भयानक ठरतील, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. सोलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केलं होते. त्यावरून अजित पवार गटाला देखील राणेनी सुनावलं आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची एक वादग्रस्त व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. त्यावरून राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन सुरु केलं आहे. किरीट सोमय्या यांनी अलीकडे शिवसेना ठाकरे गटाविरोधात आघाडी उघडली होती. थेट मातोश्रीवर त्यांनी आरोप केले होते. त्यामुळे हा व्हिडीओ समोर येताच ठाकरे गटाने संधी साधत आपल्याला त्रास देणाऱ्या किरीट सोमय्या यांचा वचपा काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ठाकरे गटाप्रमाणेच सोलापूर मध्ये अजित पवार गटाने देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं. अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ खेदजनक असल्याचं म्हटलं होतं. या सर्वांचा भाजपा नेते निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे.

“उद्धव ठाकरे गटाला आणि काही प्रमाणात अजित पवार गटाला असं वाटतय की राज्यभर आंदोलन करून ते किरीट सोमय्याला संपवतील. एका व्हिडिओमुळे कोण संपत नसतो म्हणून किरीट सोमय्या येणाऱ्या काळात ठाकरे गटासाठी भयानक ठरेल ही आम्हाला खात्री आहे. काही दिवस थांबा, कळेल संपला कोण…” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!