“नीम का पत्ता कडवा है….” ; किरीट सोमय्या यांच्या विरोधात मालवणात ठाकरे गट आक्रमक !
महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश ; फोटोला काळे फासून पायदळी तुडवत संताप केला व्यक्त
किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला “कलंक” ; तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका
मालवण | कुणाल मांजरेकर
कथित अश्लील व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत आलेल्या भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मंगळवारी मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्यांची कृती महिलांचा अपमान करणारी आहे. भाजपा आताही त्याला पाठीशी घालणार काय ? असा सवाल तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी केला. या प्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता.
येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालया समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, सन्मेश परब, पंकज सादये, बंड्या सरमळकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, सिद्धेश मांजरेकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर, करण खडपे, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, सेजल परब, निना मुंबरकर, तृप्ती मयेकर, सुर्वी लोणे, हिना कांदळगावकर, पूजा तळाशीलकर, पूजा साळकर, स्मिता सरमळकर, लक्ष्मी पेडणेकर, माधुरी प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
किरीट सोमय्या हा परप्रांतीय माणूस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. भाजप सरकारने दिलेल्या संरक्षणात फिरणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर भाजपचे सरकार कोणती कारवाई करणार की त्यांना संरक्षण देणार ? महाराष्ट्रातील जनता या किरीट सोमय्याला हाकलून लावणार आहे. व्हिडीओ च्या माध्यमातून महिलांची छेड छाड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.