धामापुरात भर रस्त्यात मगरीचे दर्शन ; रहिवाशांमध्ये घबराट

धामापूर तलाव परीसरात फिरताना खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आवाहन

मालवण : मालवण – कुडाळ मार्गावर धामापूर तलाव, भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक मुख्य रस्त्यावर काल मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान सहा ते आठ फूट लांबीची एक मोठी मगर फिरत असल्याचे मालवण येथील वाहन चालकांना दिसून आले. या परिसरात मगरीच्या दर्शनामुळे धामापूर तलावातील मगरींचे वास्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

रात्री रस्त्यावर मगर दिसताच वाहनचालकांनी त्यांचे मित्र व स्थानिक रहिवाशी ॲड. कन्हैया निवतकर यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी ॲड. निवतकर, सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर यांनी वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना मगरीच्या संचाराबद्दल माहिती दिली. त्यानुसार आज दुपारी वनरक्षक एस. एम. कांबळे, वनपाल राठोड यांनी धामापूर येथे जात मगर दिसलेल्या परीसराची पाहणी केली. यावेळी सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, प्रशांत गावडे, महेश परब हे उपस्थित होते.
यावेळी स्थानिक रहिवाशांनी धामापूर तलाव परीसरात फिरताना खबरदारी घ्यावी तसेच तलावाच्या पाण्यात उतरू नये असे आवाहन वनरक्षक एस. एम. कांबळे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!