भाजपा नेते निलेश राणेंच्या नेतृत्वाचा राज्यात “डंका” !

मोदी @९ अभियानात कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ गुणतालिकेत राज्यात दुसऱ्या स्थानावर

अभियान काळात प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार ; निलेश राणेंना आमदार बनवण्यासाठी कार्यकर्ते अशाच प्रकारे जीवाचे रान करतील : धोंडू चिंदरकर यांची प्रतिक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर “मोदी@९” अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात राज्य पातळीवर भाजपचे नेते तथा कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी निलेश राणे यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे. कुडाळ – मालवण मतदार संघ या अभियानात राज्यात द्वितीय क्रमांकावर असून पक्षाने दिलेले सर्व उपक्रम निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ आणि मालवण तालुक्यात यशस्वीपणे राबवण्यात आल्याने या मतदार संघाच्या गुणांकनात वाढ झाली आहे.

मोदी@९ या अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत राबवण्यात आलेल्या विकास योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्यात येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने भाजपाची सत्ता यावी आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी प्रत्येक मतदार संघात प्रभारी नियुक्त करण्यात आले असून मतदार संघात मोदी @ ९ चे सर्व उपक्रम त्यांच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानात झालेल्या कामाची ऑनलाईन नोंद केली जात असून या कामावर स्वतः नरेंद्र मोदी लक्ष ठेऊन आहेत.

कुडाळ मालवण मतदार संघाची जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील महिनाभर मतदार संघात मोदी @९ अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात असून स्वतः निलेश राणे गावागावात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून मोदींनी केलेल्या विकास कामांची माहिती देत आहेत. या अभियानात कुडाळ मालवण मतदार संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर प्रशांत ठाकूर यांचा खारघर मतदार संघ असून मालवण कुडाळ हे दुर्गम तालुके असतानाही या मतदार संघाने मोदी @९ च्या गुणतालिकेत द्वितीय क्रमांक गाठल्याने निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा राज्यात बोलबाला झाला आहे. आगामी काळात हा मतदार संघ पहिल्या स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मतदार संघ आघाडीवर

मोदी @९ अभियान काळात कुडाळ मालवण मतदार संघातील ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली, त्या कार्यकर्त्यांचे आपण व्यक्तिशः ऋणी आहोत. माजी खासदार निलेश राणे यांनी मोदी @९ अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत स्वतः पोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. या अभियानाच्या निमित्ताने निलेश राणे यांचा गावागावात संपर्क झाला आहे. याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीलाही पक्षाला होईल. मालवण कुडाळ मतदार संघ दुर्गम भागातील असतानाही निलेश राणे यांचे नेतृत्व आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची साथ यामुळे हा मतदारसंघ राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते यापुढील काळात अधिक जोमाने काम करून मालवण तालुका पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच या अभियान काळात पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी जशी मेहनत घेतली, तशीच मेहनत घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांना कुडाळ मालवण मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आणणारच, अशी प्रतिक्रिया भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केली आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!