बाSSSदेवा… कासारटाक्या, नितेश राणेंचो मंत्रीमंडळात समावेश होवंदे ; निलेश राणेंका आमदार कर !
भाजपा नेते दत्ता सामंत यांचे दीप अमावस्येच्या योगावर बैरागी कासारटाक्याला साकडे
श्री देव कासारटाका आमचा नवस पूर्ण करणारच सांगत तात्काळ बकऱ्याचा नवस फेडला ; मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा भेटीला येणार
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यात येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. या विस्तारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे डॅशिंग आमदार नितेश राणे यांच्या नावाची चर्चा असून आ. राणे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी भाजपच्या वतीने रविवारी दीप अमावस्येच्या योगावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेल्या मालवण तालुक्यातील बैरागी कासार टाका येथे नवस केला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून हा नवस करण्यात आला. श्री देव बैरागी कासारटाका हे स्थान नवसाला पावणारे आहे. त्यामुळे आमचा नवस नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास असल्याने नवसाला बोललेला बकरा आजच याठिकाणी नवसफेड म्हणून अर्पण करीत असून नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा नवस फेडीसाठी कासारटाक्याच्या चरणी येणार असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. दरम्यान, कुडाळ मालवण मतदार संघातून माजी खासदार निलेश राणे आमदार होऊन मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला चालना मिळो, असे गाऱ्हाणे देखील यावेळी घालण्यात आले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कनिष्ठ सुपुत्र असलेले आमदार नितेश राणे सलग दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. कोकणातील ते भाजपचे एकमेव आमदार असून आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यात वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – भाजपचे सरकार सत्तेवर आले आहेत. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारला पाठींबा दिला असून यावेळी अजित पवार यांच्यासह त्यांचा एकूण ९ सहकाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. येत्या काही दिवसात पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार आहेत. या विस्तारात आमदार नितेश राणे यांचा समावेश व्हावा, म्हणून भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून आज बैरागी कासारटाका येथे बकऱ्याचा नवस करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राजू बिडये, ललित चव्हाण, प्रमोद करलकर, संदीप मालंडकर, कमलेश कोचरेकर, सुधीर वस्त, प्रशांत बिरमोळे, निनाद बादेकर, ओंकार लुडबे, हेमंत चव्हाण, मंगेश पात्रे आदी उपस्थित होते.
नितेश राणे हे भाजपचे कोकणातील एकमेव आमदार आहेत. महाराष्ट्रातील अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख असून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या रूपाने भाजपाला सिंधुदुर्गातील पहिला मंत्री मिळेल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. तसेच माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ – मालवण मतदार संघात सक्रिय असून त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. कुडाळ मालवण मतदार संघातून ते आमदार होवोत, आणि मतदार संघातील सर्व रखडलेले प्रश्न मार्गी लागोत, असे साकडे देखील श्री देव कासारटाक्याच्या चरणी घातल्याचे दत्ता सामंत म्हणाले.