२०२४ ला गुलाल आपलाच ; जि. प., पं. स. मध्येही १०० % यश मिळवण्यासाठी कामाला लागा…

मोदी @9 अभियाना अंतर्गत कोळंब – कातवड येथील भाजपाच्या टिफिन बैठकीत माजी खासदार निलेश राणे यांचे कार्यकर्त्याना आवाहन

काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात करून दाखवलं

मालवण | कुणाल मांजरेकर

काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात करून दाखवलं. २०१४ च्या अगोदर जी कामे आपल्याला कधीच दिसली नाही, जी कामे होतील की नाही ही शंका होती, ती मोदी साहेबांनी साध्य करून दाखवली. मग अयोध्येत भारताचा झेंडा फडकवणे असो अथवा अयोध्येतील राम मंदिर… विकासाचे अनेक महामार्ग मोदी साहेबांच्या काळात उभे राहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणेसाहेब, पालकमंत्री चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. ह्याच विकासाच्या जोरावर येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला मत मागायची आहेत. वरच्या राजकारणात काय व्हायचंय ते होऊदेत, ते बघायला आपले वरिष्ठ नेते सक्षम आहेत. आपल्याला मोदी साहेबांकडे बघून कामाला लागायचं आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत गुलाल आपलाच असला पाहिजे. तसंच येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला १०० % यश मिळालच पाहिजे. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कातवड कोळंब येथे आयोजित भाजपच्या टिफिन बैठकीत बोलताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी@९ उपक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत रविवारी रात्री मसुरे जि. प. मतदार संघातील कोळंब कातवड येथे माजी खासदार तथा कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद ‘टिफिन बैठक’ संपन्न झाली. यावेळी निलेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यात सुरू असलेल्या मोदी @९ अभियानाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. गेला महिनाभर कुडाळ मालवण मतदारसंघात मोदी @९ अभियान अंतर्गत घर घर संपर्क अभियान राबविले जात आहे. त्याचाही आढावा निलेश राणे यांनी घेतला. पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्वजण चांगले काम करत आहात असे सांगत सर्वांचे कौतुक केले. सोबतच उपस्थित कार्यकर्त्यासोबत स्नेहभोजन केले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, विजय ढोलम, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर, संतोष साटविलकर, आप्पा लुडबे, बबलू राऊत, विरेश पवार, दादा नाईक, अशोक चव्हाण, रवींद्र टेंबुलकर, विजय निकम, संतोष गावकर, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, अमित गावडे, शक्ती केंद्रप्रमुख मंगेश चव्हाण, बूथ अध्यक्ष विनायक धुरी, भिकाजी परब, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, सुनील लाड, विजय सारंग, हनुमंत धुरी, गणेश आचरेकर, उमेश चव्हाण, रामदास ढोलम, निखिल करलकर, निलेश परब, सचिन नरे, अर्जुन चव्हाण, दीपक कोरगावकर, नागेश मोहिते, प्रकाश मोहिते, अमित लोके, दिगंबर लोके, सत्यवान लोके, चंद्रशेखर लोके, उत्तम चव्हाण, सुनील लाड, विजय सारंग, हनुमंत चौगुले, दाजी कनेरकर, चेतन वस्त, तेजस न्हिवेकर यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी@९ अभियान २०२४ पर्यंत चालणार

मोदी @९ अभियान इकडेच संपले असे समजू नका. हे अभियान २०२४ पर्यंत असेच चालू राहणार आहे.त्याबाबत वेळोवेळी आपल्याला पत्रके दिली जातील. २३ जुलै पासून नवमतदार नोंदणी आणि अन्य कामे आपल्याला मिळणार आहेत. तसेंच प्रत्येक मंडलात पाच ठिकाणी भिंती रंगवून मोदींच्या कामाची प्रसिद्धी करायची असून उद्याच्या ३० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०२ वा “मन की बात” कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम प्रत्येक बूथवर पाहताना त्याठिकाणी टिफिन बैठक आयोजित करायची आहे. याबाबतच्या रीतसर सुचना आपल्याला दिल्या जातील, असे निलेश राणे म्हणाले.

यावेळी निलेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर मार्गस्थ असताना अनेक महत्वाचे निर्णय मोठमोठ्या विकास प्रकल्पांसोबत सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन अनेक लोकाभिमुख योजनाही राबवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशात आदरपूर्वक सन्मानित केले जात आहे. जागतिक स्तरावर भारताचे स्थान भक्कम होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षातील कार्य अहवाल घराघरात पोहचवा, असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदर्श घ्या…

मोदी @ ९ अभियान पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. आम्ही एकही दिवस सुट्टी न घेता उपक्रम राबवत असून पक्षाचा प्रत्येक वरिष्ठ पदाधिकारी यासाठी झटत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः दिवसातील १८ – १८ तास यासाठी झटत आहेत. त्यांचे कुटुंब विदर्भात असून ते मुंबईत बसून हे अभियान राबवत आहेत. त्यामुळे जर आपले वरिष्ठ १८ ते २० तास पक्षासाठी देत असतील तर आपणही किमान तीन ते चार तास पक्ष संघटना वाढीसाठी वेळ दिला पाहिजे, असे निलेश राणे म्हणाले.

यावेळी परिसरातील विकास कामांबाबत निवेदन ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या माध्यमातून निलेश राणे यांच्याकडे देण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!