“आपला आमदार, कामगिरी दमदार” ; कांदळगाव मधील “तो” उपरोधिक बॅनर चर्चेत !
काही कालावधीतच बॅनर सोशल मीडियावर व्हायरल ; कांदळगाव मधील खड्डेमय रस्ता पुन्हा चर्चेत
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडील काही कालावधीत सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून मालवण तालुक्यातील कांदळगावात खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या अज्ञात व्यक्तींनी स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्या बाबत नाराजी व्यक्त करणारा बॅनर रामेश्वर मंदिर नजीक लावला आहे. “आपला आमदार कामगिरीत आमदार” असं म्हणत या बॅनरच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांना फटकारले आहे. काही महिन्यांपूर्वी कांदळगाव- मसुरे रस्त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी फोन वरून हा रस्ता एका महिन्यात दुरुस्त करून देण्याची ग्वाही दिली होती. मात्र अनेक महिने लोटून देखील रस्त्याचे काम न झाल्याने अज्ञात व्यक्तींनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हा बॅनर लावल्याची चर्चा सुरू आहे.
मालवण तालुक्यातील कांदळगाव-मसुरे या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील रामेश्वर मंदिरासमोर बॅनर लावण्यात आला असून या बॅनरवर खड्डेमय रस्त्यांची छायाचित्रे आहेत. बॅनरवर ‘आपला आमदार कामगिरी दमदार’ असा ठळक उल्लेख असून ‘हे श्रेय कोणाचे ? त्या एका फोन कॉलचे की अकार्यक्षम दमदार कामगिरीचे’ असाही उल्लेख करण्यात आला आहे. रविवारी सकाळी हे बॅनर दिसून आले असून गावात या बॅनरची चर्चा आहे.
कांदळगाव मसुरे रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. या मार्गावरून वाहन चालवणे मुश्किल बनले असून हा मार्ग अपघात मार्ग बनला आहे. काही महिन्यांपूर्वी येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन छेडले होते. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी मोबाईलवर संपर्क साधून महिन्याभरात रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला काही महिने उलटले. मात्र रस्ता काम सुरूच झाले नाही. रस्ता अधिकच नादुरुस्त बनला आहे. रुग्ण, गरोदर महिला यांना वैद्यकीय तपासणी, उपचारासाठी या मार्गावरून नेणे धोक्याचे बनले आहे. सर्वसामान्य प्रवासीही या मार्गावरून प्रवास करू शकत नाही अशी मार्गाची अवस्था बनली आहे. या पार्श्वभूमीवर श्री देव रामेश्वर मंदिर समोर लावण्यात आलेला बॅनर लक्षवेधी ठरत आहे.
सोशल मीडियावर देखील “त्या” बॅनरची जोरदार चर्चा
आमदार वैभव नाईक यांच्या बाबत नाराजी व्यक्त करणारा बॅनर कांदळगाव मध्ये लावल्याची बाब रविवारी समोर आल्यानंतर काही कालावधीतच हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “कांदळगाव मधील लोकांनी आंदोलन केलं, त्यावेळी साहेबांनी फोनवर आश्वासन दिलेले १ महिन्यात रस्ता कामाला सुरुवात… हे आश्वासन पूर्ण झालं असत तर लोकांनी असे पोस्टर लावले नसते…. नुसतं तोंड काळं ” असं म्हणत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.