सावधान ! साडेसहा कोटी खर्च केलेला कोळंब पूल पुन्हा ठरतोय धोकादायक ; पूलाला खालून तडे !

दुरुस्तीसाठी दीड ते दोन वर्षांपूर्वीच खर्च केलेली ६ कोटी ३४ लाखांची रक्कम गेली कुठे ?

दुरुस्तीवेळी टाकलेला भराव न काढल्याने स्थानिकांना बसतोय फटका

भराव न काढल्यास २२ सप्टेंबर पासून खाडीपात्रात आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा ; सा. बां. मंत्र्यांचे वेधले लक्ष

कुणाल मांजरेकर

मालवण : सागरी महामार्गावरील कोळंब पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा पूल धोकादायक बनल्याने दीड ते दोन वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी ६ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये एवढी रक्कम ठेकेदाराला अदाही करण्यात आली. मात्र अल्पावधीतच सदोष कामामुळे या पुलाला खालून तडे गेले आहेत. तसेच पुलाचे काम करताना ठेकेदाराने पुलाखाली टाकलेला भराव अद्यापही न काढल्याने स्थानिक मच्छिमार आणि रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्ती कामात फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसने करत याप्रकरणी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पुलाखालील भराव काढण्यासाठी २२ सप्टेंबरची डेडलाईन काँग्रेसने दिली असून अन्यथा स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थांसह खाडीपात्रात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सागरी महामार्गावरील कोळंब पूल धोकादायक बनल्याने दीड ते दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले होते. या कामाची निविदा करताना अंदाजित रक्कम ३ कोटी ९५ लाख रुपये दाखविण्यात आली. मात्र यानंतर वाढीव काम दाखवून या रकमेत सुमारे अडीच कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. आतापर्यंत या पुलाच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. मात्र या पुलाचे काम करताना संबंधित ठेकेदाराने खाडीपात्रात टाकलेला गाळ अद्यापही न काढल्याने परिसरातील नागरिक आणि मच्छीमारांना याचा फार मोठा फटका बसत आहे. या भरावामुळे पाण्याचा प्रवाह अडला गेला असून यामुळे परिसरात मासे मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच भरावामुळे पाण्याचा प्रवाह अडून यंदा देऊळवाड्यात पर्यंत नागरिकांच्या घरादारात पुराचे पाणी घुसण्याचा प्रकार घडला. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने हा भराव काढण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही संबंधित ठेकेदाराकडून करून घेतलेली नाही. त्यामुळे हा भराव काढण्यासाठी आता राष्ट्रीय काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. या पुलाचे काम सदोष पद्धतीने झाले असून त्यामुळे येत्या काही काळात या पुलाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा काँग्रेसने थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या पूलासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपयांची रक्कम खर्च करूनही पुलाच्या खालील बाजूचे काम पूर्णपणे निकृष्ट आणि बोगस झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी तसेच हे काम करताना सदरील कंपनीने खाडीपात्रात सुमारे चार ते साडेचार हजार ब्रास भराव टाकून तात्पुरत्या स्वरूपाचा कच्चा बंधारा बांधलेला आहे. शासन खाडीतील गाळ काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने खाडी बुजविण्याचे काम ठेकेदाराला दिले होते का ? असा सवाल काँग्रेसने या निवेदनातून केला आहे. या बंधाऱ्यासाठी टाकलेला भराव न काढल्यामुळे खाडीपात्रात मासेमारी करणाऱ्या होड्या आणि आऊट बोटी पुलाच्या पलीकडील बाजूस मासेमारी करिता जाऊ शकत नाहीत. पारंपारिक मच्छीमार पावसाळी हंगामात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. या खाडीत असलेली कांदळवने व विविध जैविकता, शंख-शिंपले यांचीसुद्धा हानी होत आहे. या बंधाऱ्यामुळे खाडीपात्र गाळाने भरत असून आजूबाजूच्या वस्तीत पुराचे पाणी शिरत आहे. याबाबत वर्षभर सार्वजनिक बांधकाम विभाग, मालवण, सावंतवाडी यांच्यासोबत पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाने कागदी घोडे नाचवण्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. त्यामुळे या बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी होऊन सदरील भराव त्वरीत काढावा, अशा आशयाचे निवेदन काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सादर केले आहे.

कोळंब पुलाखाली टाकलेला मातीचा भराव
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मच्छिमारांसमवेत कोळंब पुलाला भेट देऊन पाहणी केली.

कॉंग्रेसकडून पत्रकारांसमवेत पुलाची पाहणी
कोळंब पुलाची दुरुस्ती नंतर अल्पावधीतच दुरावस्था झाली आहे. शनिवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छिमार आणि पत्रकारांसमवेत या ठिकाणी पाहणी केली. यावेळी पुलाला ठिकठिकाणी तडे गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, प्रथमेश करंगुटकर, बबन कोयंडे, महादेव पाटील, प्रथमेश राऊत, प्रमोद खडपकर आदी मच्छिमार उपस्थित होते.

कोळंब पुलाला ठिकठिकाणी तडे जाऊन हा पूल पुन्हा धोकादायक बनला आहे

काँग्रेस २२ सप्टेंबर पासून खाडीपात्रात बेमुदत आंदोलन करणार
कोळंब पुलाची दुरुस्ती करताना ठेकेदाराने खाडीपात्रात टाकलेला सुमारे चार ते साडेचार हजार ब्रास लाल मातीचा भराव ठेकेदाराने अद्याप न काढल्याने स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या खाडीपात्रातील भराव त्वरित काढावा आणि संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या खाडीत मासेमारी आणि इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या धुरीवाडा आणि कोळंब येथील ग्रामस्थां समवेत २२ सप्टेंबर पासून खाडीपात्रात भरावावर बसून बेमुदत आंदोलन करणार आहेत. याबाबत काहीही घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!