शिक्षकांच्या मागणीसाठी आ. वैभव नाईकांचं दीड तास भर उन्हात ठिय्या आंदोलन
मालवण पं. स. कार्यालयाच्या आवारात शिवसैनिकांकडून शिंदे – फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी
कायमस्वरुपी शिक्षक मिळेपर्यंत डीएड, बीएड बेरोजगारांना जि. प. च्या स्वनिधीतून सेवेत घ्या : आ. नाईक यांची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
“शिक्षणमंत्री तुपाशी… विद्यार्थी उपाशी…”, “५० खोके ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके”, “स्वतःला ५० खोके, शिक्षकांना दिले धोके”, ” शिक्षणमंत्र्यांचा निषेध असो”, “शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत”, “शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं”, “शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “आवाज कुणाचा शिवसेनेचा, वैभव नाईक आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणांनी गुरुवारी मालवण पंचायत समितीचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. निमित्त होते आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या मागणीसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनाचे… जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात अन्य जिल्ह्यात बदली झाली असून यामुळे अनेक शाळा शिक्षकां अभावी ओस पडणार आहेत. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारच्या या मनमानी कारभारा विरोधात आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. गटविकास अधिकारी बाहेर असल्याने तब्बल दीड तास आ. वैभव नाईक यांनी भर उन्हात थांबून या आंदोलनाचे नेतृत्व केले.
दरम्यान, कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून जिल्ह्यातील डी. एड., बी. एड. बेरोजगार युवकांना शिक्षण सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी आ. नाईक यांनी केली. याबाबत पावसाळी अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहोत. मात्र येत्या १५ दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. नाईक यांनी दिला आहे.
मालवण पंचायत समितीच्या आवारात ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, गौरव वेर्लेकर, समीर लब्दे, सिद्धेश मांजरेकर, अमित भोगले, कांदळगाव सरपंच रणजित परब, कोळंब सरपंच सिया धुरी, भाई कासवकर, उदय दुखंडे, नरेश हुले, विनायक परब, श्वेता सावंत, निनाक्षी मेथर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरु झाले. मात्र गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याने ते येईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आ. नाईक यांनी घेतला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गटविकास अधिकारी दाखल झाले. तोपर्यंत आ. नाईक यांच्यासह शिवसैनिक रखरखत्या उन्हात बसून होते. यावेळी उशिरा आल्याबद्दल शिवसैनिकांनी गटविकास अधिकारी बाळासाहेब गुजर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे जिल्ह्यातील १२९ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध होणार नाही. शिक्षक नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान होणार आहे. एकीकडे प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी प्रयत्न होत असताना १२९ शाळांमध्ये एकही शिक्षक नसणे ही बाब फार गंभीर आहे. शिक्षकांविना शाळा हे धोरणच शाळा बंद करण्यास आणि विद्यार्थी व पालक यांचा कल इंग्रजी माध्यम व अन्य शाळांकडे वळण्यास कारणीभूत ठरणार आहे. या शाळांवर शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता असलेले पालक निश्चितच दुसरा पर्याय शोधणार. तसे झाल्यास या शाळांमधील मुले अन्य ठिकाणच्या शाळेत किंवा इंग्रजी माध्यम शाळेत जाणार आहेत. पर्यायाने या शाळा बंद होणार आहेत. शासनाच्या या कृतीबाबत पालकवर्गात नाराजीचा सूर आहे. १२१ शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध न झाल्यास शालेय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केला जाणार असून विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक नुकसानीला शासनच जबाबदार राहणार आहे, याबाबत आपण विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.