मालवणात उद्या मोफत आयुष्यमान कार्ड विशेष मोहीम ; नागरिकांना “ई कार्ड” चे वाटप होणार
सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांचा पुढाकार ; ताम्हणकर फिश सेंटरवर उपक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने सोमवार पेठ येथील ताम्हणकर फिश सेंटरच्या कार्यालयात मोफत ‘आयुष्मान कार्ड’ विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात नागरिकांना ई कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. ५ लक्ष वैद्यकीय संरक्षण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. १.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी – रु. २.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण) प्रति कुटुंब, प्रति वर्ष देण्यात येते. आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी शिधापत्रिका / प्रधानमंत्री महोदयांचे पत्र व वैध ओळखपत्र (उदा. आधार कार्ड/पॅनकार्ड आवश्यक आहे. तरी गरजू नागरिकांनी रेशनकार्ड आणि आधारकार्ड किंवा पॅनकार्ड घेऊन या केंद्रावर संपर्क करावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांनी केले आहे.