मालवण तालुक्यात मोदी@9 अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा
भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांचे आवाहन ; मालवणात मोदी@9 ची आढावा बैठक संपन्न
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षांच्या कार्यकाळात सर्वसमावेशक कामे करून जनतेला त्याचा फायदा मिळवून दिला आहे. या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्यासाठी मोदी @9 अभियान राबवले जात आहे. मालवण तालुक्यात भाजपाकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी असून या अभियानाची प्रभावी अंमलबजवणी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुक्याचा मोदी@9 अभियानाचा आढावा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी येथील भाजपा कार्यालयात घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विलास हडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, महेश सारंग, आबा हडकर, प्रमोद करलकर, विजय निकम, निनाद बादेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी@9 अंतर्गत मालवणमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचे प्राथमिक नियोजन यावेळी करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे कार्य जास्तीत जास्त जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले.