मालवणच्या बोर्डींग मैदानावरून भविष्यात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू घडावेत !
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या सदिच्छा ; बाबा परब मित्रमंडळ आयोजित ‘निलेश राणे चषक ” क्रिकेट स्पर्धेला भेट
राजकारणात वेगळा झाल्यानंतर परत आणण्याचे काम बाबा परब मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेने केले ; निलेश राणेंचे उदगार
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी रात्री मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर सुरु असलेल्या निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेला भेट दिली. यावेळी बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य वातावरणात भरवण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेच्या निमित्ताने मालवणचे बोर्डिंग मैदान आंतर राष्ट्रीय स्पर्धेच्या धर्तीवर सजवण्यात आले आहे. या मैदानावर अतिशय सुंदर वातावरणात दर्जेदार क्रिकेट पाहण्याची संधी निलेश राणे, बाबा परब आणि त्यांच्या मित्रमंडळाने दिली आहे. भविष्यात या मैदानावरून राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, अशी सदिच्छा ना. राणे यांनी व्यक्त केली. तर मध्यंतरीच्या काळात राजकारणात वेगळा झाल्यानंतर आपल्याला परत आणण्याचे काम बाबा परब मित्रमंडळाच्या या क्रिकेट स्पर्धेने केले, असे सांगून अशा प्रकारच्या दर्जेदार स्पर्धा बाबा परबच आयोजित करू शकतो, अशा शब्दात या स्पर्धेचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित निलेश राणे चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डींग मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेला ना. राणे, माजी खा. निलेश राणे यानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, उद्योजक डॉ. दीपक परब, सुशील कारखानीस, आयोजक बाबा परब, अरविंद सावंत, आशिष हडकर, मोहन वराडकर, ललित चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि बाबा परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने ना. राणे, माजी खा. निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. राणे यांनी क्रिकेटच्या आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. आज व्यस्त शेड्युलमुळे मैदानावर जाता येत नाही. मात्र बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर येण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले. यावेळी निलेश राणे यानी स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक करतानाच संघानी मैदानावर वेळेचे बंधन पाळायला हवे, पंचांशी कोणीही हुज्जत घालू नये अशी सूचना केली.