बूथ सक्षमीकरणासाठी मालवणात राणेसरांनी घेतला भाजपा पदाधिकाऱ्यांचा “क्लास” ; संघटना बांधणीचे दिले धडे…

बूथ रचना प्रभावी करण्यासाठी उद्यापासूनच कामाला लागण्याच्या सूचना ; पुढील दौऱ्यात बूथनिहाय आढावा बैठका घेणार

येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय आपलाच होण्यासाठी निर्धार करा ; निलेश राणे यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

संघटना मजबूतीकरणासाठी भाजपने बूथ सक्षमीकरण हाती घेतले आहे. भाजपच्या वतीने शनिवारी कुंभारमाठ मधील अथर्व मंगल कार्यालयात केंद्रीयमंत्री नारायण राणे, प्रदेश सचिव माजी खा. निलेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील ग्रामीण कार्यकर्त्यांचा बूथ सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ना. राणे यांनी उपस्थित बूथ कमिटी अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा “क्लास” घेतला. या पदाधिकाऱ्यांशी “थेट” संवाद साधताना गावातील पक्षाची स्थिती आणि आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर ना. राणे यांनी चर्चा केली. राणे सरांनी घेतलेल्या “क्लास”मुळे अनेकांची भंबेरी उडाली. संघटना बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी उद्यापासूनच कामाला लागावे, अशी सूचना यावेळी ना. राणे यांनी करतानाच पुढील वेळी आपण स्वतः बूथवर येऊन बैठक घेणार आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आपली स्पर्धा वैभव नाईक अगर अन्य विरोधकांशी नसून आपले सर्व कार्यकर्ते एकत्र आले तर आपला पराभव करण्याची क्षमता कोणातच नाही, असे सांगून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय आपलाच होण्यासाठी निर्धार करा, असे आवाहन केले.

मालवण तालुका भाजपचा ग्रामीण बुथ कार्यकर्ता मेळावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, सरोज परब, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, दीपक पाटकर, मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, ललित चव्हाण यासह अन्य प्रमुख पदाधिकारी बुथ अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बुथ अध्यक्ष, प्रभारी यांच्याकडून आढावा घेत मंत्री नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ना. नारायण राणे म्हणाले, मालवण वासीयांबद्दल माझ्या मनात आदर आहे प्रेम आहे. १९९० साली कोणतीही ओळख नसताना मला विजयी करून विधानसभेत पाठवले. त्याच बळावर मी राज्यात व देशातील अनेक पदे भूषवली हे मी विसरू शकत नाहीत. राज्य असो केंद्र असो जनतेसाठी जे मागू ते मिळते. जिल्ह्यात रस्ते, वीज, पाणी, रोजगार या प्राथमिक सुविधा दिल्या. मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज आणले. आता जिल्ह्यात इंडस्ट्रीयल पार्क दोडामार्ग येथे होत आहे. येथे 200 ते 300 कारखाने येणार असून सिंगापूर येथील कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. माझ्या जिल्ह्यात बेकारी राहता नये, येथे उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी एमएसएमई मार्फत प्रशिक्षण सुरु असून यापुढे रोजगार निर्मिती करणारे उद्योजक अधिकाधिक स्वरूपात जिल्ह्यातून घडवणे यासाठी आपले प्राधान्य असणार आहे. असेही मंत्री नारायण राणे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आला आहे. 2030 मध्ये ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विविध प्रकल्प माध्यमातून गतिमान विकास सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढत आहे. आणखी वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. जी २० देश प्रमुखपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले आहे. जागतिक कीर्तीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला लाभले. हा आपला अभिमान आहे. त्यांचे हात अधिक बळकट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, धर्म आहे. २०२४ ला ४०० हून अधिक लोकसभा जागांवर विजयाचे लक्ष आपण ठेवले असून हे लक्ष मिळणारच. असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्यावरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. देशाच्या विकासात यांचे योगदान काय? विकास करणे यांच्या आमदारांना खासदारांना शक्य नाही. केवळ जनतेची दिशाभूल करणे हेच या पक्षांचे काम आहे. ठाकरे गटाला आता स्वतःचे अस्तित्व नाही असाही टोला मंत्री नारायण राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी तर पैसे घेऊन तिकीट देण्याचे काम नेहमी केले. असाही हल्लाबोल मंत्री नारायण राणे यांनी केला. मला भाजपने मोठे केले मी भाजपला मोठे करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार ही भावना प्रत्येक कार्यकर्त्यांची असली पाहिजे. त्यासाठी १०० टक्के योगदानातून काम करा. आगामी सर्व निवडणुकीत १०० टक्के विजय हेच लक्ष प्रत्येकाचे असले पाहिजे. बुथ सक्षम करा. असेही मंत्री नारायण राणे म्हणाले.

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व सर्व टीमचे कौतुक केले. मालवण तालुक्यात सर्वांनी जोमाने काम केल्यास ९० टक्के मतदान भाजपला मिळेल. असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार, राणे साहेबांच्या माध्यमातून, राज्य शासन माध्यमातून जिल्ह्यात मोठा विकासनिधी येत आहे. असेही राजन तेली यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व मालवण नगरपालिका निवडणुकीत १०० टक्के यश मिळवल्यास वैभव नाईक आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याचे धाडस करणार नाहीत. असेही राजन तेली यांनी सांगितले. देश सक्षम होत आहे. महासत्ता दिशेने वाटचाल होत आहे. २०२४ सर्व निवडणुकीत भाजपचा विजय हेच लक्ष. असेही राजन तेली यांनी सांगितले.

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, बुथ सक्षम ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यात १०० टक्के यश मिळेलच. मात्र लोकसभा व तीनही विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणे हे आपले प्रमुख लक्ष आहे. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळ मतदारसंघात चांगले काम होत आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील तीनही आमदारा मध्ये दयाळू आमदार निलेश राणे असतील. ८० टक्के नव्हे तर ९० टक्के मतदान आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी काम करूया. असेही दत्ता सामंत म्हणाले. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी बुथ सक्षम बाबत माहिती दिली. अतुल काळसेकर यांनी मार्गदर्शन केले. बुथ प्रमुख हा संघटनेचा महत्वाचा घटक आहे. असे सांगितले. रत्नागिरी व कुडाळ लोकसभा मतदारसंघ पहिल्यांदा भाजप कमळ निशाणीवर लढणार आहे. आणि जिंकणार आहे. देशात ४०० प्लस हे भाजपचे टार्गेट आहे. त्यात हा लोकसभा मतदारसंघ आहे. सर्वांनी जोमाने काम करा. ८० टक्के पेक्षा जास्त मतदान प्रत्येक बुथवर होईल. असा विश्वास अतुल काळसेकर यांनी व्यक्त केला. अतुल काळसेकर, राजन तेली, निलेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचा विजय हाच निर्धार ; निलेश राणे

आपली स्पर्धा वैभव नाईक किंवा कुठलाही पक्षाशी नाहीच. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय हाच निर्धार आहे. १०० टक्के यश कोणीच रोखू शकत नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयाचा निर्धार करा. तीनही आमदार आणि खासदार आपलाच असला पाहिजे. असे निलेश राणे यांनी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व मालवण तालुक्यतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कामाचे निलेश राणे यांनी कौतुक केले. मालवण तालुक्यात ज्या वेगाने काम चालू आहे त्याच वेगाने ठेवूया. २०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी राणे साहेबाना पाडलं त्याला पाडल्या शिवाय गप्प बसणार नाही. असे निलेश राणे यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3594

Leave a Reply

error: Content is protected !!