दुसऱ्याच्या कामाला जाऊन स्टिकर चिकटवणे हेच वैभव नाईक, विनायक राऊतचे काम
भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचा हल्लाबोल ; अणाव, वराड पुलाचे श्रेय भाजपचेच
मालवण | कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे साडेसात वर्षे सत्तेतील आमदार, खासदार होते. या काळात त्यांना अणाव आणि वराड या पुलांची कामे करून घेता आली नाहीत. मात्र मागील आठ – नऊ महिन्यात सरकार बदलल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामातील तांत्रिक अडचणी दूर केल्या. तर आपण स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना ज्या भाषेत समजते, त्या भाषेत समजावले. त्यामुळे मे महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होणार, याची माहिती घेऊनच वैभव नाईक आणि विनायक राऊत हे रिकामटेकडे श्रेय घेण्यासाठी काल ह्या कामाच्या ठिकाणी गेले. दुसऱ्याच्या कामाला जाऊन स्टिकर चिकटवणे हे वैभव नाईक, विनायक राऊतचे रोजचेच काम आहे. आपण आमदार, खासदार आहोत, त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून लोक लक्षात ठेवतील अशी कामे करा, अशा शब्दात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी नाईक, राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी वराड आणि अणाव पुलाच्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. यावेळी सदरची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करीत खा. राऊत आणि आ. नाईक यांच्यावर टीका केली आहे. काल वैभव नाईक आणि विनायक राऊत हे दोन रिकामटेकडे अणाव आणि वराड पुलाची पाहणी करायला गेले. अणाव पुलाची वर्कऑर्डर २०१७ ला निघाली. तर वराड पुलाची वर्कऑर्डर २०१४ ला निघाली. मागच्या ९ वर्षांपैकी साडे सात वर्ष हे दोघेजण सत्तेतील आमदार, खासदार होते. तरीपण यांना हे काम करायला जमलं नाही. मागील आठ नऊ महिन्यात नवीन सरकार बसल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामातील तांत्रिक अडचणी सोडवल्या. मी स्वतः त्या साईटवर गेलो आणि ठेकेदाराला, अधिकाऱ्यांना ज्या भाषेत कळतं, त्या भाषेत सांगितलं. त्यानंतर ९० ते ९५ % काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे श्रेय घेण्यासाठी हे दोघे तिकडे गेले आणि एका महिन्यात काम पूर्ण करा, असे सांगितले. निलेश राणेने दोन महिन्यापूर्वी ही तारीख संबंधिताना दिली आहे. त्यामुळे हे काम मे महिन्यात पूर्ण होणारच आहे. हे त्यांनाही माहित आहे. त्यामुळे क्लिपिंग बघूनच हे
तिकडे गेले होते. तुमची काम करण्याची पद्धत मला माहित आहे. दुसऱ्याच्या कामाला जाऊन स्टिकर लावणे, ह्या पलीकडे तुम्हाला काही जमलं नाही. थोडी लाज शरम ठेवा. तुम्ही आमदार खासदार आहात. जे काम तुम्हाला आठ नऊ वर्षात जमलं नाही, ते काम तुम्हाला एका महिन्यात जमणार ? मग तुमच्या सत्ता काळात का नाही जमलं ? तुम्ही आमदार खासदार आहात, स्वतः काहीतरी काम करा. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नका. नाहीतर देशाच्या, महाराष्ट्राच्या रिकामटेकड्या लोकप्रतिनिधींच्या यादीत तुमची नावं टाकावी लागतील. लोक लक्षात ठेवतील असं काहीतरी करा. भाजपच्या माध्यमातून ही काम झाली आहेत. उर्वरित काम आहेत ती पण भाजपच्या माध्यमातून होतील, असे निलेश राणे यांनी म्हटलं आहे.