मारहाण प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता ; मालवण न्यायालयाचा निर्णय
संशयितांच्या वतीने ॲड. रूपेश परुळेकर यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
येथील आनंद अतुल हुले यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आरोपातून राज गणेश जाधव यांच्यासह चार जणांची मालवण येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्या वतीने ॲड. रूपेश परुळेकर यांनी युक्तिवाद केला.
संशयीत आरोपींमध्ये शिवप्रसाद श्रीकृष्ण मालवणकर (रा. कोथेवाडा), ॲलेक्स मिनीन फर्नांडिस (रेवतळे) आणि संतोष संजय सुर्वे (रा. कुंभारमाठ) यांचा समावेश होता. ही मारहाणीची घटना १७ सप्टेंबर २०२१ रोजी देऊळवाडा सागरी महामार्गा नजिक घडली होती. या बाबत फिर्यादी आनंद हुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन बस स्थानकाकडून कुंभारमाठला जात होते. यावेळी बस स्थानका नजिक एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती. त्यावेळी गाडी पार्किंग बाबत हुले यांनी विचारले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हुले हे गाडी घेऊन पुढे गेले असता आरोपीनी त्यांचा पाठलाग करून त्यांची गाडी देऊळ वाडा सागरी महामार्ग येथे अडवून त्यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले. याबाबत आनंद हुले यांच्या तक्रारीनुसार चार जणांवर भादवि कलम 341, 323, 427, 504, 506(1), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. मात्र जबानीतील विसंगती आणि सबळ पुराव्या अभावी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.