गाबीत समाज दाखवणार एकजूट : महोत्सवानिमित्त २७ एप्रिल रोजी एक दिवस मासेमारी राहणार बंद
गाबीत समाजाच्या बैठकीत निर्णय ; समाज बांधवांकडून महोत्सवाची जोरदार तयारी सुरु
मालवण : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रथमच होणाऱ्या गाबीत महोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून गाबीत बांधवांकडून या महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी आज झालेल्या नियोजन आढावा बैठकीत या महोत्सवातून गाबीत समाजाची एकजूट दाखवून देण्याचा निर्धार करतानाच महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २७ एप्रिल रोजी आपला मच्छिमारी व्यवसाय बंद ठेवून या महोत्सवाच्या शुभारंभात हिरीरीने सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय उपस्थित गाबीत बांधवानी घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, गोवा, कर्नाटक येथे गाबीत समाज विखूरलेला असून या गाबीत समाजाला एकत्र आणण्याच्या प्रमुख उद्देशाने दांडी किनाऱ्यावर आयोजित होत असलेल्या गाबीत महोत्सवानिमित्त गाबीत बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. गाबीतांकडून गाबीतांसाठी आयोजित आणि केवळ गाबीत बांधवांच्या आर्थिक सहाय्यातून होणारा हा महोत्सव भव्य दिव्य करण्यासाठी गाबीत बांधव प्रयत्नशील आहेत. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या गाबीत वस्ती मोठ्या संख्येने असणाऱ्या तालुक्यामध्ये महोत्सव नियोजन बैठका होत असून तळागाळातील गाबीत बांधवापर्यंत महोत्सवाची माहिती पोहचवली जात आहे.
या महोत्सवात गाबीत समाजातील बांधव- भगिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सागरी सुंदरी, पाककला, जलतरण, नौकनयन, शेंडी पागणे (पारंपारिक मच्छिमारी), रांगोळी, चित्रकला, निबंध अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २७ एप्रिल रोजी या महोत्सवाचा भव्य शुभारंभ होणार असून त्यावेळी दांडी किनाऱ्यावरून बांधवांची मिरवणूक तसेच समुद्रातून माशाली घेऊन सजवलेल्या नौकांची फेरी निघणार आहे. तसेच हा महोत्सव केवळ करमणूकीसाठी न राहता गाबीत बांधवाना विविध नोकरी, रोजगार तसेच मच्छिमारी व्यवसायातील शासकीय नोकरीच्या संधी, व्यावसायिक संधी, शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्रेही आयोजित केली आहेत.
या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज धुरीवाडा येथील संस्कार हॉल मध्ये अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गाबीत समाजाची नियोजन आढावा बैठक पार पडली. यावेळी निधी संकलन, स्पर्धा व कार्यक्रम नियोजन याबाबत आढावा घेण्यात आला. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २७ एप्रिल रोजी सर्व गाबीत बांधवाना शुभारंभ कार्यक्रमात सहभागी होता यावे, यासाठी त्यादिवशी मासेमारी व्यवसाय बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.