मालवण बंदर जेटीवरील वाहनतळाच्या कामातील त्रुटी व्यापारी संघाने आणून दिल्या निदर्शनास….
महेश कांदळगावकर – यतीन खोत यांचाही पुढाकार ; त्रुटी दूर करून काम करण्याच्या संबधिताना सूचना
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील बंदर जेटी येथे बंदर विभागाकडून वाहन तळ उभारला जात आहे. मात्र सदरील काम सदोष पद्धतीने सुरु असून येथील त्रुटींकडे मालवण व्यापारी संघाने गुरुवारी बंदर विभागाचे लक्ष वेधले. या कामाला व्यापारी संघाचा विरोध नाही, पार्किंग सुविधा होत असल्याने बाजारपेठेचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र यातील त्रुटी दूर न केल्यास पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी देखील यासाठी पुढाकार घेतला.
बंदर विभागाच्या माध्यमातून बंदर जेटी येथे वाहनतळाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू असून या कामातील काही त्रुटींमुळे भविष्यात बाजारपेठेला त्रास सहन करावा लागणार आहे. याबाबत मालवण व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने बंदर अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, हर्षल बांदेकर, मयू पारकर, सौ. शिल्पा खोत, विवेक पारकर, बाळू जंगले, मुश्ताक अथनीकर आदी उपस्थित होते.
मालवण बंदर जेटी नजिक वाहन वाहन तळाचे काम बंदर विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. मात्र या कामाच्या नियोजन आराखड्यात त्रुटी असून या त्रुटी व्यापारी बांधवांनी गुरुवारी बंदर विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या. मालवण बाजारपेठेच्या दिशेने या वाहन तळाला दरवाजा ठेवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बाजारात येणाऱ्या वाहनांची गैरसोय होणार होती. सदरील बाब व्यापारी संघाच्यावतीने बंदर विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वाहनांच्या आणि माणसांच्या जाण्या येण्यासाठी दरवाजा ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे.
पावसाळयात मालवण शहरातील गटाराचे पाणी वेगवेगळ्या मार्गाने समुद्राकडे येते. या पारंपरिक मार्गातील सागर किनारा हॉटेल कडील मार्ग या वाहनतळामुळे बंद होणार आहे. याला पर्याय म्हणून बंदर विभागाने आपल्या आरेखनात जी व्यवस्था केली आहे, ती तशीच राहिल्यास पावसाळ्यात तीन मार्गाने येणारे पाणी अडून भरतीच्या वेळी बाजारपेठेत पाणी साचण्याची शक्यता आहे. ही बाब व्यापारी संघाने बंदर विभागाच्या निदर्शनास आणून दिली. पाणी जाण्याच्या पारंपरिक मार्गाला बाधा न आणता वाहनतळाचे काम मार्गी लावावे, अशी सूचना करून त्यासाठी व्यापारी संघाचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही व्यापारी संघाच्या वतीने दिली. दरम्यान, व्यापारी संघाच्या सूचनेनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याठिकाणी जागेची पाहणी करण्यात येणार आहे. या कामाबाबत व्यापारी संघाने समाधान व्यक्त करून हे काम थांबवण्याचा आमचा मानस नाही. फक्त भविष्याचा विचार करून हे काम करण्यात यावे, अशी सूचना व्यापारी संघाने केली आहे.