राहुल गांधी आगे बढो ; हम तुम्हारे साथ है… मालवणात काँग्रेसची निदर्शने
मालवण : राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाबाजी करीत मालवण मध्ये तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ येथे काळ्या फिती लावून हे निषेध आंदोलन करण्यात आले.
हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजीं विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे आणि याचाच आधार घेत आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून या देशातील लोकशाहीचा अंत मोदी सरकारने केला आहे, असा आरोप तालुका काँग्रेसने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने शनिवारी फोवकांडा पिंपळ येथे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, महेंद्र मांजरेकर, श्रेयस माणगांवकर, लक्ष्मीकांत परुळेकर, देवानंद लुडबे, किशोर नाचणोलकर, संदीप परब, पराग माणगांवकर, मेघ:श्याम लुडबे, हेमंत माळकर, श्रीकृष्ण तळवडेकर, लुईस मेंडीस, मधुकर लुडबे, योगेश्वर कुर्ले, आप्पा चव्हाण, सरदार ताजर, समीर आंगणे आदी उपस्थित होते.