शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक : वेंगुर्ला संघाची उपांत्य फेरीत धडक
मालवण : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या डे नाईट क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या सामान्यांमधून रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला विरुद्ध माऊली युवक क्रीडा मंडळ यांच्यात रंगलेला निर्णायक सामना टाय होऊन थरारक सुपर ओव्हरमध्ये वेंगुर्ला संघाने कर्णधार अंगद पाटील याच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर गोवा संघाने दिलेले सहा धावांचे माफक आव्हान पार करत विजय मिळविला. या विजयामुळे वेंगुर्ला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.
दि. १५ ते १९ मार्च या कालावधीत टोपीवाला बोर्डिंग मैदानावर प्रकाशझोतात होत असलेल्या या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचा आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोटारसायकल रॅली काढून शुभारंभ झाला. खासदार विनायक राऊत यांनी या स्पर्धेस उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुड मॉर्निंग मालवण विरुद्ध रोहन करंजेकर पुणे यांच्यातील पहिल्या सामन्यात पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना मयूर कारंडे व ललित मुसळे यांच्या धुवाधार फलंदाजीच्या साथीने ६ षटकात १ बाद ९१ धावांचा डोंगर उभारला. ९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुड मॉर्निंग मालवण संघाची फलंदाजी ढेपाळून हा संघ सहा षटकात ५ बाद ५२ धावा जमवू शकल्याने पुणे संघ विजयी झाला. यात पुणे संघाचा मयूर कारंडे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात ब्राह्मणदेव कुंभारमाठ संघाने ३ बाद ३५ धावा केल्या. हे आव्हान रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाने पार करत ८ गड्यांनी विजय मिळविला. वेंगुर्ला तर्फे दमदार गोलंदाजी करणारा फिरोज शेख सामनावीर ठरला. तिसऱ्या सामान्यात wcc बागायत संघ धाडसकळ गोवा संघाच्या भेदक गोलंदाजी समोर ७ बाद २९ धावा जमवू शकला. गोवा संघाने हे आव्हान पार करीत ७ गड्यांनी विजय मिळविला. गोवा तर्फे साधू नाईक व जयदीप यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले. साधू नाईक सामनावीर ठरला. चौथ्या सामन्यात सिटी बॉईज संघ माऊली युवक क्रीडा मंडळ गोवा संघाच्या गोलंदाजी समोर ढेपाळून ५ बाद ३१ धावा जमवू शकला. हे आव्हान माऊली संघाने बिनबाद पार करत विजय मिळविला. माऊली संघातर्फे प्रीतम बारी व आपाली करंगुटकर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले, आपाली करंगुटकर सामनावीर ठरला. यानंतर झालेल्या बाद फेरीच्या सामान्यांमध्ये रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला व रोहन करंजेकर पुणे संघातील पहिल्या सामन्यात वेंगुर्ला संघाने ४ बाद ७५ धावा केल्या. यात किरण पवार याने सर्वाधिक ३४ धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे संघ ३ बाद ६३ धावांपर्यंत मजला मारू शकल्याने वेंगुर्ला संघ विजयी झाला. किरण पवार सामनावीर ठरला. तर माऊली युवक क्रीडा मंडळ गोवा विरुद्ध धाडसकळ गोवा यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात माऊली संघाने प्रथम फलंदाजी करत ४ बाद ७२ धावा जमविल्या. यात प्रथमेश पवार (३०) याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र हे आव्हान धाडसकळ गोवा संघाला न पेलवल्याने ते ८ बाद ४१ धावांपर्यंत मजल मारू शकल्याने माऊली संघ विजयी झाला. माऊली संघातर्फे ३ विकेट घेणारा अनिकेत सानप सामनावीर ठरला.
यानंतर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ विरुद्ध माऊली युवक क्रीडा मंडळ गोवा यांच्यात झालेल्या निर्णायक सामन्यात वेंगुर्ला संघाने ९ बाद ५५ धावा केल्या. हे आव्हान घेऊन खेळणारा माऊली संघही ५ बाद ५५ धावा जमवू शकल्याने हा सामना टाय होऊन सुपरओव्हर खेळविण्यात आली. यात माऊली संघ वेंगुर्ला संघाचा कर्णधार अंगद पाटील याच्या भेदक गोलंदाजी समोर एका षटकात केवळ ५ धावा करू शकला. ६ धावांचे आव्हान वेंगुर्ला संघाने पार करत विजय मिळवीत उपांत्य फेरीत धडक मारली. अंगद पाटील सामनावीर ठरला.
या स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून बंटी केरकर, पंच म्हणून ऍम्बरोज आल्मेडा, उमेश मांजरेकर, दीपक धुरी, मंगेश धुरी, सुशील शेडगे, गुणलेखक गणेश राऊळ, पायस आल्मेडा, समालोचक म्हणून शाम वाक्कर, बादल चौधरी, प्रदीप देऊलकर, नाना नाईक, उत्तम मुणगेकर हे काम पाहत आहेत.