आ. वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश कोणत्याही क्षणी ; पदाधिकाऱ्यांचा दावा !
आ. नाईक दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनाबाहेर पडून ; ठाकरेंनाही कळून चुकल्याने जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं
संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह ना. केसरकर, ना. सामंत यांच्यावरील टीकेचा घेतला समाचार ; वैफल्यग्रस्त होऊन ती टीका टिपण्णी
मालवण | कुणाल मांजरेकर
आ. वैभव नाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात असतात. एवढेच नाही तर नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या दालना बाहेर पडून असतात. त्यांनी ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही क्षणी ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी परिस्थिती आहे. हे उद्धव ठाकरे यांनाही कळून चुकल्याने वैभव नाईक यांची तातडीने जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. विनायक राऊत यांच्या बॅनर वरून वैभव नाईकांचा फोटो गायब झाला आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी आता शिवसेनेत यावे. संघटनेत त्यांचे स्वागतच असेल, मात्र शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी आमदार म्हणूनच राहावे, ठाकरे गटासारखी संघटनेत ढवळाढवळ करू नये, असा सल्ला देखील शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर आणि कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मालवण तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद सागरी महामार्गावरील हॉटेल रामेश्वरमध्ये घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, महिला तालुकाप्रमुख रिया आचरेकर, गीता नेवाळे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, अरुण तोडणकर, महिला उपतालुकाप्रमुख भारती घारकर, शबनम शेख, शहरप्रमुख बाळू नाटेकर, महिला शहरप्रमुख लुईदीन फर्नांडिस, हडी महिला विभाग प्रमुख शिल्पा तोंडवळकर, उपविभाग प्रमुख शाहीन शेख, राजा तोंडवळकर आदी उपस्थित होते. श्री. गावकर म्हणाले, शिवसेनेचे नवनियुक्त लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यावर आमदार नाईक टीका करत आहेत. मात्र फाटक यांच्या ताकदीची त्यांना कल्पना नाही. माजी आरोग्य मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे रवींद्र फाटक यांचीच कामगिरी आहे. त्यामुळेच फाटक हे असेच आणखी प्रवेश घेत राहतील या भीतीने आमदार नाईक हे फाटक यांना जिल्ह्याबाहेर काढण्याची भाषा करत आहेत. आज आपण निधी आणल्याचा दावा आमदार नाईक करत आहेत. मात्र हा निधी त्यांनी आणला नसून तो मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केला आहे. महामार्गावर लागलेल्या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेच्या बॅनर मध्ये आमदार नाईक यांचा फोटो दिसत नाही. आमदार नाईक व खासदार विनायक राऊत यांच्यात काय चालू आहे हे सर्वश्रुत आहे. तौक्ते वादळ काळात एकनाथ शिंदे यांनी पुरविलेल्या मदती मधूनच नाईक यांनी वादळग्रस्ताना मदत केली. त्यामुळे नाईक यांचे स्वतःचे कर्तृत्व काय हे आम्हाला माहित आहे. मंत्री केसरकर व मंत्री सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नाईक यांची त्यांच्यापर्यंत पोहचण्याची ऐपत नाही. विकासकामाची गती नाही. केवळ टक्केवारीची कामे आमदार नाईक करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असणारे आमदार नाईक यांनी आमच्या शिवसेनेत येत असतील तर त्यांनी जाहीर प्रवेश करावा. तसे झाल्यास ती मोठी राजकीय उलथापालथ असेल. मात्र आमच्या पक्ष संघटनेत त्याना ढवळाढवळ करता येणार नाही, असे श्री. गावकर यांनी स्पष्ट केले. आम्ही ठाकरे गट शिवसेनेत असताना आमदार नाईक यांचे बरेच अनुभव घेतले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी न राहता पाठी खेचायचे काम त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी केलेल्या मेहनतीची, उपकाराची जाण नाईक यांना नाही, असेही गावकर म्हणाले.
यावेळी शिंदे म्हणाले, आमदार नाईक यांनी ठाकरे गट शिवसेनेत स्वतःची संघटना चालविण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायम संपर्कात असणारे आमदार नाईक हे ताकाला येऊन भांडे लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांची फसवणूक करण्यापेक्षा त्यांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश करून दाखवावा, असे सांगून कोणत्याही क्षणी हा प्रवेश होऊ शकतो, असे ते म्हणाले.