मालवणात उद्या उद्योजक, नवउद्योजक, किरकोळ – घाऊक व्यापारी, बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळावा
माजी खा. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या एमएसएमई मंत्रालयाच्या वतीने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे युवा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार (MSME) यांच्या सहकार्याने शनिवारी १८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे उद्योजक, नव उद्योजक, किरकोळ आणि घाऊक व्यापारी, बचत गट यांना उद्योगासाठी आवश्यक कर्जपुरवठा, सरकार कडून मिळणारे अनुदान याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या बरोबर ज्या उद्योजकांची कर्ज प्रकरणे बॅकेने प्रलंबित ठेवली आहेत. तसेच सरकारचे अनुदान उपलब्ध झालेले नाही, अशा उद्योजकानाही यावेळी मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जाणार आहे. या मार्गदर्शन मेळाव्यात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती PMEP, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती CMEGP, खादी ग्रामोद्योग कर्जपुरवठा व अनुदान, कॉयर बोर्ड नारळापासून वस्तू बनवणे यासाठी कर्ज पुरवठा आणि अनुदान व आवश्यक बाजारपेठ, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मश्चिमाराना फायदे, अनुसूचित जाती जमाती उद्योजकांना व्यवसायाबद्दल माहिती व प्रशिक्षण व अनुदान, एक कोटी वरील उद्योगाला MSME मार्फत स्वतंत्र मार्गदर्शन व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन, पर्यटन उद्योगासाठी मार्गदर्शन, सामूहिक उद्योग क्लस्टर याची सविस्तर माहिती व फायदे, महिला उदयोजकांना ८०% अनुदान मिळणारी योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उद्योगाची माहिती देण्यात येणार आहे. या योजनांच्या लाभार्थींसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात येईल. या मेळाव्यास MSME चे वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र , कॉयर बोर्ड, एस सी /एस टी हब या सर्वांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्योजकांना कर्ज पुरवठा घेताना आवश्यक असणाऱ्या उद्योग आधारची नोंदणी सर्व उद्योजकांना मोफत करून देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड व बँकेचे खाते घेऊन येणे आवश्यक. तरी सर्व उद्योजकांनी, व्यापारी बांधवांनी, बचत गट यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मौनीनाथ मंदिर ट्रस्ट, मालवण यांच्यावतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी विजय केनवडेकर जिल्हाध्यक्ष, उद्योग व्यापार आघाडी भाजपा सिंधुदुर्ग, गणेश कुशे सचिव मौनीनाथ मंदिर ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधावा.