सुरेश प्रभूंना विश्वासात न घेताच चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा घाट ?

सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या माजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांनाच विश्वासात न घेतल्याने आश्चर्य 

खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली “ही” प्रतिक्रिया ! 

कुणाल मांजरेकर 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोंबर रोजी होऊ घातले आहे. या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू असताना ज्यांच्या कारकीर्दीत या विमानतळाला चालना मिळाली, त्या माजी नागरी हवाई उड्डयनमंत्री आणि विद्यमान राजसभा खासदार  सुरेश प्रभू यांनाच उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करताना केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी विश्वासात घेतले नसल्याची बाब समोर आली आहे. मालवण येथील पत्रकार परिषदेत चिपी विमानतळाबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होतय का ? असं वक्तव्य खा. प्रभू यांनी करत आपल्याला याची कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट प्रत्येक राज्यसभा खासदाराला कळवण्याची पद्धत नाही, असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र या वक्तव्यातून खा. प्रभू यांनी आपली नाराजी दाखवून दिल्याची चर्चा होती.

     गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मालवण मेढा येथे मूळ गावी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी  चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी केंद्रीयमंत्री व नारायण राणे उद्योगमंत्री असताना झाले होते. त्यानंतरच्या काळात या विमानतळाचे काम रखडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आपल्याकडे नागरी उड्डयन मंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पहिल्याच बैठकीत चिपी विमानतळाचा आढावा घेत यात ज्या परवानग्या आवश्यक होत्या त्या मी मिळवून दिल्या. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. हे विमानतळ राज्य सरकारचे असल्याने विमान टेकऑफ, लॅण्डींगसाठी ते योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच विमानाने आपण दिल्लीला गेलो. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन हे फीत कापून न होता उड्डाण करून झाले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून स्थानिक पातळीवर रस्ते, रनवे आदी कामे करायची होती. मात्र ही कामे वेळेत न झाल्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या ९ ऑक्टोबरला सुरेश प्रभूचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनीही याच दिवशी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत श्री प्रभू यांना विचारले असता आपल्याला या विमानतळाच्या सद्यःस्थितीबाबत काही माहिती नाही. कोणी जाहीर केले असेल तर त्यानुसार होईल. त्यामुळे त्यावर मी अधिक टिपण्णी करणार नाही, असे ते म्हणाले. यावर माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांना या विमानतळाच्या उद्घाटनाबाबत कल्पना नाही हे कसे असू शकेल असे विचारले असता ते म्हणाले, सरकार एवढं मोठ आहे. उद्घाटनाची तारीख कोणीतरी ठरविली असेल. प्रत्येक गोष्ट प्रत्येक राज्यसभा सदस्यांना कळविण्याची गरज नसते. तशी पद्धत आपल्याकडे नाही असे सांगत श्री. प्रभू यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!