दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर देवालयाकडील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

पतन अभियंत्यांनी सा. बां. च्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रातून उघड : सन्मेश परब यांनी दिली माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांमधून होत आहे. या बंधाऱ्यावरून भाजपा आणि ठाकरे गटात श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सन्मेश परब यांनी या बंधाऱ्यासाठी आमदार वैभव नाईक यांनीच पाठपुरावा केल्याचे पत्र समोर आणले आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पामध्ये हे काम समाविष्ट करण्यासाठी पतन अभियंता सिंधुदुर्ग यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये याबाबतचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

शहरातील दांडेश्वर मंदिर ते मोरयाचा धोंडा या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी स्थानिक मच्छीमारांची अनेक वर्षापासून मागणी आहे. यासंदर्भात अलीकडेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्मेष परब यांनी माहिती देताना दांडी मोरेश्वर रांज येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे या दोन कामांसाठी २०२०-२१ आणि २०१७-१८ अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात या बंधाऱ्याचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. याला भाजपाचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आक्षेप घेत या दोन्ही वेळच्या अर्थसंकल्पांमध्ये या कामांचा समावेश नसून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सन्मेश परब यांनी आमदार वैभव नाईक यांच्याच पाठपूराव्यातून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात दांडी किनारपट्टी वर धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध होण्या करिता प्रयत्न सुरु असल्याचा पुरावा समोर आला आहे.

सिंधुदुर्गच्या पतन अभियंत्यांनी ५ जानेवारी २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये सिंधुदुर्गातील काही कामाना २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद होण्याबाबत मागणी केली आहे. यात दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर देवालया पर्यंत बंधारा कम रस्ता बांधण्याच्या कामाचा समावेश आहे. यासाठी आमदार वैभव नाईक यांची मागणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ४ जानेवारी २०२२ रोजी आ. नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना कुडाळ, मालवण मधील दहा कामे विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचे पत्र सादर केले होते. हे पत्र देखील श्री. परब यांनी समोर आणले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!