सिंधुदुर्गात अंमली पदार्थांची खासगी कुरिअर, पोस्टाने देवाण – घेवाण होण्याची शक्यता
संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी होणार ; हॅन्डीस्कॅनर, डॉग स्कॉडचाही वापर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्ह्यात अफू, गांजा लागवडीची माहिती देण्याऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा ; नाव गोपनीय ठेवणार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ खासगी कुरीयरने तसेच पोस्टाव्दारे देवाण-घेवाण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही शक्यता गृहित धरुन संशयास्पद पार्सलची अचानकपणे तपासणी करावी. यासाठी हॅन्डीस्कॅनर आणि आवश्यक त्या ठिकाणी डॉग स्कॉडचाही वापर करावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सोनोने म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या ई-पिक पहाणी ॲपवर पीक नोंदणीचे काम सुरु आहे. ई-पीक नोंदणी करताना गांजा लागवड झाली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी तात्काळ यंत्रणांना कळवावे. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, यासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात यावी. नशाबंदी, व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने व्यसनामुळे होणाऱ्या आजाराबाबत कार्यक्रम घ्यावेत.व्याख्यान, कार्यशाळा त्याबरोबर प्रशिक्षण याचे आयोजन करावे. सर्व विभागांनी अंमली पदार्थ लागवड, विक्री तसेच वाहतूक याविरोधात मोहीम राबवावी.
गांजा लागवडीची माहिती देणाऱ्यास बक्षीस
आपल्या आसपासच्या परिसरात छुप्या पध्दतीने जर कोणी गांजा अथवा अफुची लागवड करत असल्यास किंवा केली असेल तर याबाबतची माहिती तात्काळ ओरोस येथील पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228200/ 228614 या दूरध्वनीवर संपर्क साधून द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त राखले जाईल शिवाय त्याला बक्षीसही दिले जाईल. असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीला अशा लागवडीची माहिती पुरवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, प्रभारी आरोग्य अधिकारी सई धुरी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस अलमेडा, उत्पादन शुल्क निरीक्षक अमित पाडळकर, वनपाल दत्तगुरु पिळणकर, तंत्र अधिकारी सचिन कांबळे,आदी उपस्थित होते.