खूप शिका… मोठे व्हा… उद्योजक बना आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी हातभार लावा !

शासकीय तंत्रनिकेतन मधील कृतज्ञता मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा आजी- माजी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र

मालवण | कुणाल मांजरेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडून तरुणांना उद्योजक बनण्यासाठी साद घातली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केलं जात असून यांमुळेच दरडोई उत्पन्नात दहाव्या क्रमांकावर असलेला आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या काळात पाचव्या क्रमांकावर आला आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून नवउद्योजकांना अनेक संधी निर्माण करून देण्यात आल्या आहेत. या खात्याला वर्षाला सात लाख कोटींचे बजेट देण्यात आले आहे. तरुणांना आर्थिक सक्षम करून येत्या दोन वर्षात आपला देश उत्पन्नात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा मोदींचा मानस आहे. त्यामुळे तरुणांनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यामध्ये हातभार लावावा, असे आवाहनात्मक प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण यांचे यांनी कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना केले.

येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता स्नेहमेळाव्या अंतर्गत माजी विद्यार्थी संघाच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ शासकीय तंत्रनिकेतन येथे केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, दत्ता सामंत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव ललित वंजारे, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, बाबा परब, उत्तम जाधव, हेमंत सावंत, अमेय बर्डे, कमलिनी प्रभु आदी उपस्थित होते. ना. राणे म्हणाले, मी गेली ३७ वर्षे राजकारण व व्यवसायात आहे. दोन्ही क्षेत्राकडे मी सारखेच लक्ष दिले. त्यामुळेच दोन्ही क्षेत्रात मी यश मिळवू शकलो. तरूणांनी नोकरी पुरता मर्यादित विचार न करता उद्योगाकडे वळायला हवे. सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला तरूण उद्योजक घडवायचे आहेत. येत्या काही काळात मला इंजिनियरींग व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग जिल्ह्यात आणायचे आहेत. त्यासाठी मला स्थानिक नवउद्योजकांची साथ हवी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे. उद्योगाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर रहावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम यांचे त्यांनी कौतुक केले.

राणेंच्या मंत्री पदानंतर सिंधुदुर्ग विकासाची नवीन पहाट

माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी राणेंच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. १९९४ मध्ये राणेसाहेब आमदार असताना शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. १९९५ मध्ये राणेसाहेब मंत्री होताच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची नवीन पहाट झाली. त्यामुळेच शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या बांधकामाला चालना मिळाली. आज या इमारतीला २३ वर्षांचा काळ लोटला आहे. या काळात इमारतीची अवस्था जीर्ण झाली असून निर्जीव झालेल्या या इमारतीच्या पुनरुज्जीवनासाठी एकमेव व्यक्ती म्हणजे नारायण राणेसाहेब होय. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे सहा कोटींचा निधी अपेक्षित आहे. यातील काही निधी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून मंजूर झाला असून उर्वरित निधीसाठी राणेसाहेबांनी सहकार्य करावे. माजी विद्यार्थी संघानेही या इमारतीसाठी आपला हातभार उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कॉलेजच्या सभागृहाचे नूतनीकरण माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सुशोभित केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य सुरेश पाटील यांनी गेल्या तीन वर्षातील शासकीय तंत्रनिकेतच्या कामकाजाचा आढावा घेतला. तीन वर्षात शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी कॉलेज प्रशासन व माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ना. राणे यांनी आजी माजी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन प्रशंसा केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3598

Leave a Reply

error: Content is protected !!