आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती !
युवती सेना आयोजित बच्चे कंपनीची वेषभूषा स्पर्धा ठरली लक्षवेधी ; छत्रपतींना जिरेटोप प्रदान
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला याला इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी मालवण बंदर जेटीवरून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आ. नाईक यांच्या हस्ते शिवरायांना जिरेटोप अर्पण करण्यात आला. युवती सेनेच्या विस्तारक कु. रुची राऊत यांच्या वतीने आणि कुडाळ मालवण विधानसभेच्या समन्व्यक सौ. शिल्पा खोत यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात वेशभूषा लहान मुले आणि खुल्या गटातील वेशभूषा स्पर्धा यंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण ठरली.
आ. वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून किल्ले सिंधुदुर्गवर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे नवीन बांधकाम केल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला येथे प्रथमच शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे, भगवे झेंडे यामुळे किल्ले परिसर भगवमय झाला होता.
दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायन सादर करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा यावेळी घेण्यात आली. मालवण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला भव्य भगवा ध्वज देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. याप्रसंगी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, मंदार ओरसकर, अमित भोगले, भाई कासवकर, अनुष्का गावकर, कांदळगाव सरपंच रणजित परब, तळगाव सरपंच लता खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, मालवण महिला आघाडी तालुकाप्रमुख श्वेता सावंत, निनाक्षी शिंदे, महेंद्र म्हाडगूत, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, उमेश मांजरेकर, वायरी सरपंच भगवान लुडबे, राजू परब व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व शिवसैनिक उपस्थित होते.