कोल्ह्या, लांडग्यांची फौज तयार करून वाघाचं कातडं घातलं तरी वाघ हा वाघचं !
येणाऱ्या काळात वाघाची डरकाळी आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रात घुमताना दिसेल : हरी खोबरेकर
मालवण | कुणाल मांजरेकर
देशातील अनेक यंत्रणांवर केंद्राचा दबाव आहे. या दबावाच्या माध्यमातून अनेक निर्णय आपल्या बाजूने करून घेण्याचे काम सध्या दिसून येत आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण निशाणी गद्दार गटाने चोरली असली तरी कोल्ह्या लांडग्यांची फौज तयार करून वाघाचे कातडे घातले तरी वाघ हा वाघच असतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. येणाऱ्या काळात वाघाची डरकाळी आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व महाराष्ट्रात आणि देशात घुमताना दिसेल. त्यासाठी आमच्या सारखा प्रत्येक शिवसैनिक जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शनिवारी मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील ठाकरे गटाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, यतीन खोत, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सन्मेष परब, सचिन गिरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, निवडणूक आयोगाला हाताशी धरून आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह घेण्याचा जरी प्रयत्न झाला असला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आपल्याकडे घेण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्ष किंवा कंपन्यांमध्ये नाही. गद्दारी करून बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये खंड पडण्याचे काम संबंधितांनी केले असले तरी खऱ्या शिवसैनिकांची निष्ठा फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आहे. स्वतः बाळासाहेबांनी आम्हा शिवसैनिकांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी राहून महाराष्ट्राचे हित सांभाळण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाला आम्ही बांधील आहोत. येणारा काळ कितीही संघर्षाचा असला, कितीही अडचणी आल्या तरी गद्दारांना गाडून प्रत्येक शिवसैनिक उद्धवजींच्याच पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. या देशात आज अनेक लहान-मोठे राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत. आमदार आणि खासदारांनी ठरवून पक्षाची मालकी दुसऱ्याची होत असेल तर देशाचे भवितव्य अंधारमय आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जीवाचे रान केल्यानंतर आमदार, खासदार निवडून येतो. पण त्याची कदर न करता शिवसेनेची सदस्य संख्या आणि प्रतिज्ञापत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिक असतानाही निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, असे हरी खोबरेकर म्हणाले.