दांडी किनारपट्टी वरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांबाबत ठाकरे गटाकडून दिशाभूल
२०१७-१८, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद नाही : विजय केनवडेकर यांची माहिती
माजी खा. निलेश राणेंच्या पाठपुराव्यातून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याचे समजताच ठाकरे गटाकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील दांडी मोरेश्वर रांज येथे धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे या दोन कामांसाठी २०२०-२१ आणि २०१७-१८ अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन आठ दिवसात ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. याला भाजपाचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सालच्या अर्थसंकल्पांमध्ये या एकाही बंधाऱ्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. संपूर्ण दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपाचे युवा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर झाला आहे. हे श्रेय स्वतःला घेण्याबरोबरच दांडी येथील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचे श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.
याबाबत विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे की, मालवण मधील उद्धव ठाकरे गटाकडून मालवण तालुक्यातील किनारपट्टीतील जनतेला कायम फसवी आश्वासने देऊन खासदार व आमदार यांच्या मार्फत जनतेला फसवण्याचा एककलमी कार्यक्रम करताना पाहावयास मिळत आहे. दांडी किनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर व आठ दिवसात कामाला सुरुवात अशा प्रकारची माहिती विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात आली. यासंबंधी २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. २०२० – २१ च्या अर्थसंकल्पात आर्थिक मंजुरी देण्यात आली आणि आठ दिवसात कामाला सुरुवात होणार आहे, असे सांगून मच्छीमारांची व मालवणच्या जनतेची फसवणूक करून धूळफेक केली जात आहे. २०१७-१८ चा अर्थसंकल्पात या कामाची कोणत्याही तरतुदीची नोंद नाही. २०२०-२१ मध्ये पण अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद केलेली निदर्शनास येत नाही. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाल्यावर त्याचा आराखडा बनवला जातो. लांबी, रुंदी, उंची ठरवली जाते. अशा प्रकारचे कोणतेही आदेश पतन विभागाला किंवा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे शासनाने दिलेले निदर्शनात येत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजनात हे काम समाविष्ट नाही व तरतूदही नाही किंवा साधी टिपणी पण नाही. असे असताना आठ दिवसात कामाला सुरुवात व कोणता ठेकेदार काम करणार आहे हे घोषित करणे म्हणजे ठेकेदाराला हाताशी धरून जनतेला फसवण्यासारखे आहे. असा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे गट करताना दिसत आहे.
देवबाग किनारपट्टीवर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी विशेष निधी नारायण राणे यांच्यामार्फत निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता. याचे श्रेय भाजपाला व राणे यांना मिळेल यामुळे तत्कालीन पालकमंत्र्यांना हाताशी धरून हा निधी कसा खर्ची पडणार नाही याचे यशस्वी नियोजन करून देवबाग मधील जनतेला फसवण्याचे काम विरोधकांनी केलेले देवबाग जनता विसरली नाही.
मालवण बंदर जेटी ते मोरेश्वर मंदिर ते मोरयाचा धोंड्यापर्यंत बंधारा कम रस्ता व पार्किंग व्यवस्थेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बंधाऱ्याची खास बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी अशी लेखी स्वरूपात समक्ष भेटून मागणी केली होती. याचाच पाठपुरावा माजी खा. निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत मंत्रालयात सुरू केला होता. त्यास अनुसरून धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे पहिल्या टप्प्याचे काम २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेचे, झालेल्या चर्चेचे मंत्रालयातील मिनिट्स भाजपाकडे उपलब्ध आहे.
मालवण शहरात राजकोट मत्स्यजेटीचा विधानसभा निवडणुकीआधी मोठा गाजावाजा करत आमदारांनी शुभारंभ केला होता. याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात देण्यात आली होती. अद्याप त्याचे इंचभरही काम सुरू झाले नाही. यावेळी ठेकेदार पण जाहीर करण्यात आला होता. सद्यस्थितीमध्ये मत्स्य खात्याकडे चौकशी करता या जेटीसाठी शासनाने सीआरझेडची परवानगी घेतली नसल्याने हे काम होऊ शकत नाही, असा खुलासा मत्स्य खात्यामार्फेत करण्यात आला. त्याचबरोबर सर्जेकोट येथील मंजूर बंधाऱ्याचा आराखडा वेगळा व प्रत्यक्ष काम वेगळे अशी परिस्थिती निदर्शनात आली आहे. विरोधक बंधाऱ्याची उंची कमी करा लांबी वाढवा असे सांगून ठेकेदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी करताना पाहावयास मिळत आहेत. हा बंधारा मंजूर करताना मच्छीमारांना का विश्वासात घेतले नाही ? असा प्रश्न भाजपाला पडत आहे. उंचीवरच्या बंधार्यावरून मच्छीमार बोट वर कशी काढणार आहे हा मोठा जटील प्रश्न होऊन राहिला आहे. कामाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळेच ठेकेदाराने हे काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थसंकल्पात धुप प्रतिबंधक बंधाऱ्याची आर्थिक तरतूद नाही. जिल्हा नियोजनकडे माहिती नाही. पतन विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला कामाबद्दल माहिती नाही. मग हे काम कोणी मंजूर केले ? कसे मंजूर झाले ? याचा आराखडा जनतेसाठी जाहीर करण्यात यावा. विरोधकांसारखा विरोधाला विरोध ही भुमिका भाजपाची नाही. धुपप्रतिबंधक बंधाऱ्यास भाजपाचा कधीही विरोध नाही . हे काम मार्गी लावण्यासाठी भाजप प्रथम प्राधान्याने करत आहे. ज्याप्रमाणे चिवला बीच येथे धुपप्रतिबंधक बंधारा कम रस्ता ना. नारायण राणे यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे पूर्ण होऊ शकला, त्याच धर्तीवर भाजपा माजी खा. निलेश राणे यांच्या मार्फत प्रयत्न करीत आहे. विरोधकांनी ठेकेदाराला आमिष दाखवून काम करण्याचा प्रयत्न झाल्यास लेखी तक्रार देऊन चौकशी करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निलेश राणे यांच्यामार्फत भाजपा मागणी करणार आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.