“त्या” आरोपातून मालवण खरेदी विक्री संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाची निर्दोष मुक्तता
मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकते यांनी दिला निर्णय
आरोपींच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. स्वरूप पई, ॲड अक्षय सामंत आणि ॲड. सुमित जाधव यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सिंधू बाजार डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये अन्नधान्याच्या वितरण व्यवस्थेत अनियमितता आढळून आल्याच्या कथित आरोपातून खरेदी-विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश बापू उर्फ आबा हडकर यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळातील १५ ही आरोपींची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांवर लीगल मेट्रोलॉजी अॅक्ट नुसार खटला दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. स्वरूप पई, ॲड अक्षय सामंत आणि ॲड. सुमित जाधव यांनी युक्तिवाद केला.
खरेदी विक्री संघाच्या वतीने मालवणात सिंधू बाजार हे डिपार्टमेंटल स्टोअर चालविले जाते. १७ सप्टेंबर २०१६ रोजी लीगल मेट्रोलॉजी इन्स्पेक्टर प्रकाश बिडये यांनी या ठिकाणी छापा टाकून या स्टोअर मधील अन्नधान्याच्या वितरण व्यवस्थेत अनियमितता असल्याचा आरोप करत खरेदी-विक्री संघाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश उर्फ आबा हडकर यांच्यासह १७ संचालकांवर लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट २००९ कलम १८(१), ३६(१), लीगल मेट्रोलॉजी रुल्स ४,६(१),२, एम नुसार मालवण न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्वतः श्री. बिडये यांनी फिर्याद दिली होती. मालवण न्यायालयात याची सुनावणी होऊन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकते यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
यामध्ये तत्कालीन अध्यक्ष रमेश बापू उर्फ आबा हडकर यांच्यासह सुरेश ज्ञानदेव चौकेकर, साईनाथ रामचंद्र चव्हाण, व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस, राजन जगन्नाथ गावकर, प्रफुल्ल वासुदेव प्रभू, अभय सखाराम प्रभुदेसाई, मनोज गोविंद राऊत, विजय वसंत ढोलम, मनोज मंगलदास लुडबे, उदय भास्कर मोरे, सरोज शिवाजी परब, सुभाष राजाराम तळवडेकर, सुभाष गोपाळ चव्हाण आणि अर्जुन दत्ताराम लाड यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील छाया श्रीधर गावकर आणि हेमकांत यशवंत मेथर हे दोन आरोपी न्यायालयीन कामकाज सुरू असताना मयत झाले. या प्रकरणात बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरत मे. न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यामुळे मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.