कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेत उमेश इलेव्हन हुमरट संघाची शतकी कामगिरी
५ षटकात १०४ धावांचा डोंगर ; “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” क्रिकेट स्पर्धेला वाढता प्रतिसाद
मालवण : येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर सुरु असलेल्या कोकण नाऊ चॅनेल आयोजित “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवशी चांगलीच रंगत पाहायला मिळाली. चौकार आणि षटकारांच्या आतिशबाजीने खेळाडूंनी क्रीडारासिकांची मने जिंकली. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवशी उमेश इलेव्हण हुंबरट या संघाने ५ षटकात १०४ धावांचा डोंगर उभा करीत विक्रम रचला.
कोकणातील सर्व क्रीडा प्रेमींना पर्वणी म्हणूनच मालवणच्या बोर्डिंग मैदानावर कोकणातील सर्वात मोठ्या टेनिस बॉल राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोकण नाऊ चॅनेलचे संचालक विकास गावकर, संचालिका वैशाली गावकर आणि संचालक ओंकार गावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कोकणातील क्रिकेट खेळाडूंना मोठं क्रिडांगण उपलब्ध व्हाव आणि राष्ट्रीय उंचीवरच्या खेळाडूंसोबत खेळता खेळता लाईव्ह क्रिकेट मॅचचा आनंद घेता यावा हा उद्देश ठेऊन या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. कोकण नाऊ व्हरेनियम प्रीमियर लीग २०२३ या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक २ लाख ५१ हजार तसेच द्वितीय पारितोषिक १ लाख २५ हजार, तृतीय पारितोषिक २५ हजार आणि चतुर्थी पारितोषिक २१ हजार आणि आकर्षक चषके अशी आहेत. ही भव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोकण नाऊ चॅनेलकडून आयोजक म्हणून रोहन नाईक, निलेश जोशी, मयुर ठाकूर, मेघनाथ सारंग, योगेश खाडे हे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत तिघांनी अर्धशतकीय खेळी केली आहे. यामध्ये प्रजेश रावले (सातेरी कर्ली), सुनील मालवणकर (ओम स्पोर्ट्स म्हापण), रोहित खरात (उमेश इलेव्हन हुमरट) यांचा समावेश आहे. तर राजाराम तळवडे, सातेरी कर्ली, ओम स्पोर्ट्स म्हापण, कीर्ती स्पोर्ट्स मोरे, उमेश इलेव्हण हुमरट,विहान स्पोर्ट्स देवबाग हे संघ पुढील फेरीत क्वालिफाय झाले असून सामनावीर म्हणून प्रजेश रावले (02), ओंकार यांनी (02), दर्शन बांदेकर (01), दीपेश कानसे (01), गौरेश सावळदेसाई (02), बंटी बद्रीके (01), निखिल पराडकर (01), साहिल वायगणकर (01), सुनील मालवणकर आणि ओंकार तावडे विभागून, प्रकाश पराडकर (01), विशाल शहा (02), ग्लेन फर्नांडिस (01), रोहित खरात (01), पंकज साधये (01) यांनी बहुमान मिळवला आहे.
कोकण नाऊ चॅनेल पुरस्कृत व्हरेनियम कोकण नाऊ प्रिमियर लीग २०२३ ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्यातील प्रसिद्ध समलोचक मराठी तसेच मालवणी समलोचनाचे बादशहा बादल चौधरी आणि त्यांची टीम कार्यरत आहे. राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ही तज्ञ पाच पंचांच्या निरीक्षणाखाली खेळवली जात आहे. तसेच स्पर्धाधिकारी आणि स्कोरर देखील अतिशय महत्वपूर्ण कामगिरी करीत आहेत. आज देखील असेच नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. शेवटचे दोन दिवस राहिल्याने स्पर्धेची रंगत ही दिवसेंदिवस वाढत असून क्रीडारासिकांच्या पसंतीस उतरली आहे. कोकण नाऊ चॅनेल च्या माध्यमातून देशभरातील लाखो दर्शक ही स्पर्धा पाहत असून या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कुठला संघ पटकावतो हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.
या स्पर्धेत रविवारी अंतिम सामना होणार आहे. हे सामने रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण स्पर्धेसाठी कोलकत्ता, हैदराबादसह महाराष्ट्र गोव्यातून खेळाडू दाखल होणार आहेत एकूणच आजपासूनच हे खेळाडू आणण्याची सर्व संघाने तयारी केली आहे. त्यामुळे रविवारचे सर्व सामने रंगतदार होण्याची शक्यता आहे.