पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणात खा. विनायक राऊतांकडून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न !

निलेश राणे यांचा आरोप ; पोलीस तपासात अडथळा आणणाऱ्या खा. राऊत यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करा

ओरोस : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सत्यता बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना पोलिसांच्या तपासात अडथळे निर्माण करून कुणाला तरी वाचवण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत जाणीवपूर्वक या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव घेत आहेत. पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरी समर्थक असल्याने अनेक राजकीय पक्षांसोबत त्याच्या भेटीगाठी झाल्या आहेत. यामध्ये स्वतः विनायक राऊत याच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांचाही समावेश आहे. परंतु केवळ भेट झाली म्हणून या व्यक्तींचा पत्रकार वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणात संबंध जोडणे चुकीचे आहे. परंतु खासदार विनायक राऊत जाणीवपूर्वक नारायण राणे यांचे नाव घेऊन तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ओरोस येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

पत्रकार शशिकांत वारीशे यांचा संशयास्पद मृत्यू आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडून या प्रकरणात राणे कुटुंबावर होणारे आरोप या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विनायक राऊत मागील साडे आठ वर्षे खासदार आहे. पण राणे एके राणे हेच त्याचे काम बनले आहे. खासदार काय करतात ते देखील यांना माहीत नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे अनेक प्रश्न आज प्रलंबित असताना मागील साडेआठ वर्षात यातील एक तरी प्रश्न सोडवावा असं यांना वाटलं नाही. पंढरीनाथ आंबेरकर हा आरोपी पहिल्या दिवसापासून नाणार रिफायनरीच्या समर्थनात आहे. त्यांच्या कमिटीचा एक भाग आहे. हा माणूस अनेक व्यक्तींबरोबर अनेक व्यासपीठावर दिसून आलाय. हुस्नाबानू खलिफे, उदय समंत, राजम साळवी, विनायक राऊत सोबत देखील याचे फोटो आहेत. म्हणून या सर्वांचा या प्रकरणाशी मी संबंध जोडणार नाही. आंबेरकर याने अनेक मीटिंगा अनेक नेत्यांसोबत केल्या आहेत. पण विनायक राउतला ही सगळी नावं आठवत नाहीत. त्याला फक्त राणेच आठवतात. रिफायनरी समर्थक समितीचा तो पदाधिकारी असल्याने उद्योग खात्याच्या अनेक अधिकारी वर्गासोबत त्याची उठबस व्हायला लागली. पण विनायक राऊत त्यांचं नाव घेणार नाही. फक्त राणेंचे घेणार. पण आम्ही त्या खात्याचे मंत्री नाही. मागील सहा महिन्यात सरकार बसल्यापासून याचे कोणाबरोबर संबंध आहेत, त्यांचे नाव घेण्याची विनायक राउतने हिंमत दाखवावी. खोटं बोलायचे संस्कार बाळासाहेबानी कधीच कोणाला दिलेले नाहीत. त्याने आमच्या कुटुंबाचे नाव घेतले असले तरी आम्हाला फरक पडत नाही. कारण हवेत गोळीबार करायची विनायक राऊतला जुनी सवय आहे. पोलीस तपासात जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा विनायक राऊत पुन्हा एकदा माती खाणार आहे. हा विषय पोलीस योग्य प्रकारे हाताळतील. सरकारला जी तपास समिती बसवायची ती बसवावी. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत,असे निलेश राणे म्हणाले.

रिफायनरी जागेतील जमिनींच्या खरेदी विक्रीत ठाकरेंच्या व्यक्ती

नाना पटोले विधानससभा अध्यक्ष असताना मी स्वतः रिफायनरी परिसरातील जागांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे ही चौकशी लावण्यात आली. पण नाना पटोले अध्यक्ष पदावरून उतरल्यानंतर या चौकशीचं काय झालं ते समजलं नाही. मी पत्रकार परिषदे मध्ये या व्यवहारांचे पुरावे ठेवले होते. या व्यवहारात ठाकरेंच्या जवळची कंपनी होती. त्या कंपनी, त्याचे मालक कोण त्यांची नावे मी सांगितली होती. पंढरीनाथ आंबेरकर मागील सहा महिन्यात काय करत होता ? कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास झाला पाहिजे. सुभाष देसाई यापूर्वी उद्योग खात्याचे मंत्री होते. सुभाष देसाई, त्यांचा मुलगा भूषण देसाई यांचे काय काय व्यवहार येथील जमिनी मध्ये झाले होते, याचे पुरावे मी ठेवले होते, याची आठवण करून देतानाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं, तेव्हा उद्योग खातं रत्नागिरीकडे गेलं. उदय समंत मंत्री झाले. हे सरकार बसल्यापासून सहा महिने हा व्यक्ती माझ्या संपर्कात नाही. तरी विनायक राऊत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करतोय. तो कोणाला वाचवतोय ते पोलीस तपासात बाहेर येईल, पण पोलिसांचा तपास सुरु असताना विनायक राऊत जे करीत आहे, ती ३५३ ची केस होऊ शकते, पोलिसांनी याची दखल घ्यावी.
विनायक राउतला कोणाला तरी वाचवायचं असल्याने तो ढवळाढवळ करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3599

Leave a Reply

error: Content is protected !!