“आभाळमाया” कडून पुन्हा सामाजिक बांधिलकीचं दर्शन !
काळसे अपघातातील मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात ; ब्लड कार्डही सुपूर्द
मालवण : मालवण तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या आभाळमाया ग्रुपकडून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन झाले आहे. काळसे होबळीचा माळ येथे ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आभाळमाया ग्रुपच्या वतीने ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिव्या काळसेकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज पडल्यास ४ ब्लड कार्ड सुपूर्द करण्यात आली.
काळसे येथील अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची सुन दिव्या दिपक काळसेकर गंभीर जखमी झाली असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात आई गमावलेल्या आणि पत्नी जायबंदी झालेल्या दिपक काळसेकर यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून पत्नीच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. याबद्दल काळसे गावातील रहिवासी व पोलीस खात्यातील अधिकारी प्रमोद काळसेकर यांनी सोशल मीडियावरुन मयत रुक्मिणी काळसेकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन केले होते. गोरगरिबांना अडचणीच्या काळात तातडीने धावून जाणाऱ्या आणि रक्तदानासह अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या वराड कट्टा येथील आभाळमाया ग्रूपचे राकेश डगरे यांच्यापर्यंत हा मदतीच्या आवाहनाचा मेसेज शनिवारी पोचला. त्यानंतर त्यांनी तातडीने आभाळमाया ग्रूप वर सदस्यांना काळसेकर कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले . डगरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सदस्यांनी आपापल्या परीने आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. आभाळमाया ग्रूपच्या सदस्यांनी जमा केलेली ४५ हजार एवढी रोख रक्कम आणि दिव्या काळसेकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज पडल्यास लगेच उपलब्ध व्हावीत म्हणून ४ ब्लड कार्ड रविवारी सायंकाळी आभाळमाया ग्रूपच्या सदस्यांनी काळसे येथे जात मयत रुक्मिणी काळसेकर यांचे मुलगे किशोर काळसेकर आणि दिपक काळसेकर यांच्याकडे सुपूर्द केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी आभाळमाया ग्रूपचे ऍड. हृदयनाथ चव्हाण, भाई वेंगुर्लेकर, शुभम मसुरेकर, नितीन शेट्ये, समीर रावले, गणेश मोरजकर, सागर चव्हाण, अमित चव्हाण, प्रवीण मीठबावकर, प्रणित चव्हाण, अमोल गोसावी, राकेश डगरे हे सदस्य उपस्थित होते.