मनसेने आवाज उठवल्यानेच चाकरमान्यांच्या प्रवासातील ‘विघ्न’ दूर

मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांची माहिती

रायगड, रत्नागिरीत आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही मग सिंधुदुर्गात का ? – मनसेचा होता आक्षेप

कुणाल मांजरेकर

      रायगड, रत्नागिरी प्रमाणे सिंधुदुर्गातही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याची नियमावली जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआर बंधनकारक असल्याने गणेशोत्सवा निमित्त दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यामुळे मनसेने याबाबत सर्वप्रथम आवाज उठवल्यानेच चाकरमान्यांना गावी येण्यासाठी असलेले विघ्न दूर झाल्याची प्रतिक्रिया मनसेच्या वतीने मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

       गणरायाचे आगमन  होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिल्याने मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात चाकरमान्यांना गावी येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असल्याचे सांगितले होते. यावर मनसेनेच सर्वप्रथम आक्षेप घेतला होता. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आरटीपीसीआर चाचणी संदर्भात आवाज उठवला. रायगड रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांना विनाअट प्रवेश दिला जातो मग सिंधुदुर्गात प्रवेश देताना बंधने का? आरटीपीसीआर टेस्टबाबत कोकणातल्या तीन जिल्ह्यामध्ये असे तीन वेगवेगळे निर्णय लादले गेल्याने जनता संभ्रमीत झालेली आहे याला जबाबदार कोण? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांची गावोगावी जाऊन तपासणी करायला स्टाफ उपलब्ध आहे का? कायमस्वरुपी आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडलेला भार पाहता त्यांचा गणेशोत्सव नाक्यावरच जाण्याची शक्यता होती. 
   चाकरमान्यांना त्रासापासून वाचवायचं असेल तर इतर जिल्ह्यात लागू केलेल्या निर्णयांचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करू नये अशी मागणीही सरकारकडे मनसेमार्फत केली होती. म्हणूनच जिल्हाधिकारी यांना सिंधुदुर्गातही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याचे जाहीर करावे लागले. गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मागील वर्षी चाकरमान्यांना कोकणात येता आले नाही. परिणामी यंदा चाकरमान्यांनी दोन ते तीन महिन्यांपासून तयारी केली. रेल्वे, एसटीचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र ऎनवेळी चाकरमान्यांना कोरोनाचे दोन डोस, ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधामुळे चाकरमान्यांमध्ये जिल्हाप्रशासनाविषयी असंतोष होता. जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक विषयांवर आवाज उठवणार्‍या मनसे नेते परशुराम उपरकर यांचे अनेक चाकरमान्यांनी आरटीपीसीआर सक्ती शिथिल  झाल्याने आभार मानले आहेत.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!