मालवण नगरपालिकेची ४० कोटींची निविदा मॅनेज ?

भाजपा नेते निलेश राणें कडून संशय व्यक्त ; चौकशी करून निविदा रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र

मालवण : मालवण नगरपालिकेचे सुमारे ४० कोटी रक्कमेचे धामापुर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजुर केले आहे. या कामाची निविदा मालवण नगरपालिकेने मागच्या महिन्यात मागवली आहे. मात्र ही निविदा मॅनेज झाल्याचा संशय भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. याची सखोल चौकशी करून ही निविदा रद्द करावी, अशी मागणी त्यांनी पालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत माजी खा. राणे यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण नगरपालिकेचे सुमारे ४० कोटी रक्कमेचे धामापुर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजुर केले आहे. या कामाची निविदा मालवण नगरपालिकेने मागच्या महिन्यात मागवली आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार हे टेंडर मॅनेज केले गेले आहे अशी चर्चा आहे. अधिकाऱ्यांचे काही ठराविक कंत्राटदारांसोबत आर्थिक व्यवहार झाले आहेत अशी देखील चर्चा आहे. ई टेंडर प्रणाली असुनही नळपाणी योजनेचे काम बोगस कंत्राटदाराकडुन करून घेण्याचे कट कारस्थान काही राजकीय व शासकीय लोकांनी केले असल्याचे दिसत आहे. असे झाल्यास नळपाणी योजनेचे ४० कोटी पाण्यात जातील आणि सर्वसामान्य जनतेला भविष्यात त्रास भोगावा लागेल. ह्या टेंडर प्रक्रियेची योग्य प्रकारे चौकशी करुन सदोष निविदा रद्द करावी व पारदर्शक प्रक्रियेनुसार करावी ही आमची मागणी आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांबाबत कारवाई करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र भूमिका घेतली जाईल. असे माजी खासदार निलेश राणे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!