कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेश जयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात ; भाविकांची गर्दी

पाच दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ; आज रक्तदान शिबीर

सायंकाळी संगीत भजन तर रात्री बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग

मालवण | कुणाल मांजरेकर

श्री रेकोबा मित्रमंडळ आणि माघी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेश जयंती उत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला आहे. यंदाचे उत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. पहिल्या दिवशी भाविकांनी येथे दर्शनाला मोठी गर्दी केली होती. याठिकाणी पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी १० वाजता येथे रक्तदान शिबीर होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत भजन तर रात्री १० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा “मायाजाल” हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. बुधवारी येथे श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, १० वा. रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ७ वा. महाआरती, ७.३० वा. संगीत भजन, रात्री ९ वाजता बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कुडाळ यांचे “मायाजाल” महापौराणिक नाटक होणार आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, दुपारी ४.३० वा. हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वा. महाआरती, सायंकाळी ७.३० वा. संगीत भजन तर रात्री ९.३० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा ” मेद कुष्मांडाचा महिमा टेंबलाईचा” हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, ११ वा. सत्यनारायणाची पूजा आणि तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ७ वा. महाआरती, सायंकाळी ७.३० वा. संगीत भजन होणार आहे

मालवण पोलीस निरिक्षक विजय यादव आणि सहकाऱ्यांनी वायरीच्या राजाला भेट देऊन दर्शन घेतले.

२८ जानेवारीला रेकॉर्डडान्स स्पर्धा

माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कै. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम तीन क्रमांकांना ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपये व चषक तर लहान गटात प्रथम तीन क्रमांकांना ५ हजार, ३ हजार आणि २ हजार आणि चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मंदार लुडबे, अक्षय नरे किंवा करिष्मा लुडबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी २९ जानेवारी रोजी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गणेश विसर्जन मिरवणूक सुरु होणार आहे. तरी गणेश भक्तांनी या कार्यक्रमाना सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रा. पं. सदस्य संजय लुडबे, माजी जि. प. सदस्य सौ. संजीवनी लुडबे आणि भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!