शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मालवणातील रस्त्यांची कामे सुरु !
प्रजासत्ताक दिना दिवशी होणारे उपोषण स्थगित ; मंदार केणी यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तपस्वी मयेकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे उद्या होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री. केणी यांनी दिली आहे.
मालवण शहरातील जिल्हा नियोजन मधून देण्याल ५० लाखांच्या निधीतून शहरातील खराब रस्त्यांचे कारपेट करण्याची निविदा करण्यात आली. त्याची वर्क ऑर्डर देखील देण्यात आली होती. परंतु वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप कामास सुरुवात झालेली नाही. यामध्ये मालवण शहरातील खोत मठ, रांगोळी महाराज रस्ता, मालवण गर्देरोड रस्ता, मालवण वायरी हनुमान मंदीर रस्ता अशा रस्त्यांचा समावेश होता. ही कामे सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कॉन्ट्रक्टर मुदतीवर मुदत मागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास २६ जानेवारीला नगरपरिषदेच्या बाहेर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा मंदार केणी, तपस्वी मयेकर यांनी दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने शहरातील वायरी, रांगोळी महाराज मठ यांसह अन्य कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे उद्याचे उपोषण मागे घेण्यात येत असल्याचे मंदार केणी यांनी म्हटले आहे.