सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प करुया
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन ; जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
पालकमंत्री रमले बच्चे कंपनीच्या चमूत ; “वंदे मातरम” ने दिल्या एकमेकांना शुभेच्छा !
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.)- पर्यटन आणि सुजलाम-सुफलाम असणारा सिंधुदुर्ग जिल्हा येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया, अशा शुभेच्छा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’च्या घोषणांनी पालकमंत्री आणि विद्यार्थी- बालचमूने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना, पालकमंत्री ना. चव्हाण यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देवून, सीमेवर सैन्य दलातील जवान रात्रीचा दिवस करुन देशाची सुरक्षा करीत असल्यानेच आज आपण चांगल्या वातावरणात राष्ट्रीय सोहळा साजरा करतो, असे सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म पत्करले त्या सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो. आजच्या सोहळ्याला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील अधिकारी, विविध भागातील ग्रामस्थ विशेषत: विद्यार्थी या सर्वांचे स्वागत करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश अखंड राहीला पाहिजे. देशाची सार्वभौमता आणि येणाऱ्या काळामध्ये देश महासत्तेकडे कसा जाईल या दृष्टीकोनातून प्रत्येक नागरिकांने आपलं त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी, शासकीय अधिकारी असेल या सर्वांचे काही ना काही योगदान दिले पाहिजे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दूल कलामजी नेहमी सांगायचे तुम्हा-आम्हा सर्वांमध्ये देशामध्ये एवढी शक्ती आहे. त्यावरच देश सहज महासत्तेकडे जावू शकतो. कोरोनाच्या संकटाच्या काळात देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सामना केला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सगळे एक आहोत, देशावर आलेल्या संकटाचा ज्या पध्दतीने सामना केला, ते अभिमानास्पद आहे. त्याच बरोबर आर्थिक व्यवस्थाही बळकट व्हायला सुरुवात झाली. देशाने महासत्तेकडे पाऊले टाकायला सुरुवात केली. युवकांच्या हातामध्ये शक्ती आहे, म्हणूनच देशाने प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त पदके मिळण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण आणि कशा पध्दतीने देशाच्या भविष्यासाठी मी काय करु शकतो यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टी सांगत आहेत. स्वच्छ भारत मिशन मधून स्वच्छतेचे महत्व सांगत आहेत. अशा क्षेत्रात सर्वांनी योगदान द्यायला पाहिजे. फार आत्मीयतेने देशासाठी समर्पित भावनेतून काम करण्याची मानसिकता प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण करण्याचे काम ते करत आहेत आणि तीच काळाची गरज आहे. 21 जून हा दिवस योगदिन म्हणून साजरा करण्याचे त्यांनी योजले आणि आज संपूर्ण जगाने ते स्वीकरले. हे वर्ष येणाऱ्या काळात भरड धान्यासाठी असणारे वर्ष म्हणून साजरं कराव असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात शेती करण्याबरोबरच भरड धान्य उत्पादनावर भर दिला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये संघटीत आणि जागरुक असायला हवे. गाव तेथे क्रीडांगण, आरोग्याची सुविधा असली पाहिजे. येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल कसा होईल या दिशेने पाऊले उचलायची आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा देखील दरडोई उत्पन्नामध्ये येणाऱ्या काळामध्ये अव्वल कसा येईल यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येणाऱ्या काळात सुजलाम- सुफलाम असणारा आपला जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा येईल यासाठी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तसा आपण संकल्प करुया, असेही पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी उघड्या जीप मधून परेडचे संचलन केले. उत्कृष्ट लघू उद्योजक संजीव कर्पे यांना प्रथम, संगिता प्रभूशिरोडकर यांनी व्दितीय पुरस्कार, पूर्वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यात गुणवत्ताधारक ठरलेल्या पृथ्वीराज मोघरदरेकर, एस.के.पाटील विद्या मंदिर केळूस, मयंक चव्हाण एस.एम. हायस्कूल कणकवली, कैवल्य मिसाळ ए.एस.डी. टोपीवाला हायस्कूल, ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजना, स्वामित्व योजनेअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील मौजे कलंबिस्त व मासुरे, देवगड तालुक्यातील मौजे धालवली, लिंगडाळ व किंजवडे, कुडाळ तालुक्यातील मौजे आणाव व पाट, दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले व वझरे गावातील नागरीकांना जमीनीच्या मालकी हक्काची सनद वाटप. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगअंतर्गत कर्ज उपलब्ध दिल्याबद्दल अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकेश मेश्राम, 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक मिळवणाऱ्या पो.कॉ. वैभव नार्वेकर, अमित राणे, पोलीस अंमलदार ज्योती कांबळे, संजिवनी चौगुले, रीना अंधारी, इन्फ्रास भुतोलो, नागरिकांप्रती उत्तम कामगिरी करणारे सपोनि ए.सी.व्हटकर, हवालदार दत्तात्रय देसाई, राजेंद्र जामसंडेकर, आशिष गंगावणे, संकेत खाडे, रवी इंगळे, अनिल धुरी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री ना. चव्हाण यांनी शुभेच्छा संदेशाची सुरुवात भारत माता की जय, वंदे मातरम् ने केली. सोहळ्यानंतर याच जोशपूर्ण घोषणांनी विद्यार्थी बालचमूनेही पालकमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधत चॉकलेटचे वाटप करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. आज झालेल्या संचलनात जलद प्रतिसाद पथक, अश्रुधुराचे वज्रवाहन, दंगल नियंत्रण पथम, मोबाईल फॉरेन्सिक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, डॉग स्कॉड, 108 रुग्णवाहिका, पोलीस बॅन्ड पथक,अग्नीशमन दल कणकवली व वेंगुर्ला यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक,माजी लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.