महात्मा गांधींच्या ७५ व्या पुण्यतिथी निमित्त मालवणात २८, २९ जानेवारीला होणार “गांधीजागर” !
बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजन ; महात्मा गांधींजींबाबत अनेक पैलू, समज- गैरसमज यांचा होणार उलगडा
राज्यातील अनेक दिग्गज वक्ते, ज्येष्ठ पत्रकार करणार मार्गदर्शन
मालवण | कुणाल मांजरेकर
येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची ७५ वी पुण्यतिथी आहे. आज जगभरात गांधीजींबाबत आदराने पाहिले जाते. मार्टिन ल्यूथर किंग, अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यापासून बराक ओबामा यांच्या पर्यंत अनेकांना गांधीजी आपले प्रेरणास्थान वाटतात. मात्र दुर्दैवाने भारतात गांधी विटंबनेची शोकांतिका आजही सुरु आहे. त्यांच्याबाबत अनेक समज – गैरसमज निर्माण केले जात आहेत. गांधीजींबाबत वारंवार धादांत खोटी माहिती पसरवणे, त्यांची चेष्टा करणे हा काही मंडळींचा कायमचा उद्योग बनला आहे. त्यामुळे गांधी कोण होते, त्यांच्या बाबतच्या अनेक समज गैरसमजांचा उलगडा व्हावा, या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने २८ आणि २९ जानेवारीला “गांधी जागर” आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहून गांधीजींबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सेवांगणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंगल परुळेकर, नितीन वाळके, प्रकाश कुशे, संजय आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. परुळेकर म्हणाले, २१ जानेवारी रोजी आपल्या सर्वांचे लाडके नाना म्हणजेच प्रा. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू होत आहे. प्रा. दंडवते यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी २००५ मध्ये ‘जीवनाशी संवाद’ हे आपले आत्मचरित्र लिहिले. आत्मचरित्राच्या शेवटी आपल्या मनातील खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या देशात आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झालेली पाहिली आणि आता त्यांच्या स्मृतीची विटंबना चाललेली आपण पाहात आहोत. ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे. माझ्याभोवतालच्या वातावरणात जीवनभरातच झालेले बदल मी पहातो आणि महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन जगलेला एक, म्हणून त्यांबद्दल मी विचार करू लागतो, तेव्हा मला जाणवते की सध्याची राजकीय परिस्थिती ही आमच्या राष्ट्राच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि महात्माजी ज्या सर्व गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्यांच्याशी हा उघडउघड द्रोह आहे.
आजच्या जगातील अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरे गांधीजींच्या चरित्राच्या व विचारांच्या अभ्यासातून आणि आकलनातून मिळतील असे जगातील अनेक विद्वानांना वाटते. गांधीजींचा स्मृतिदिन जगभर आयुष्यात दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु भारतात दुर्दैवाने गांधी विटंबनेची शोकांतिका आजही चालूच आहे. गांधीजींच्या संदर्भात वारंवार धादांत खोटी माहिती पसरवणे, त्यांची चेष्टा करणे हा काही मंडळींचा कायमचाच उद्योग आहे.
गांधीजींनी भारताची फाळणी केली काय ? गांधीजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला लावले काय ? गांधीजी मुस्लिमांचे लांगुलचालन करीत होते काय ? गांधीजींनी अहिंसेचा उपदेश करून लोकांना भेकड बनवले काय ? भगतसिंगांची फाशी टाळावी म्हणून गांधीजींनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत काय ? गांधीजी आंबेडकरांचे व दलितांचे शत्रू होते काय ? गांधीजींनी वल्लभभाई पटेल व सुभाष चंद्र बोस यांच्यावर अन्याय केला काय ? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे लोकांना माहित व्हायला हवीत. या करीताच २८ आणि २९ जानेवारी रोजी बॅ. नाथ पै सेवांगणने मालवण येथे गांधीजागर या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. गांधीजींच्या चरित्राचा व विचारांचा सखोल अभ्यास करणारे महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासक, विचारवंत या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
गांधी जागरात असे होणार कार्यक्रम ….
२८ जानेवारी २०२३ रोजी १०.३० ते १२ गांधी का मरत नाही ? या विषयावर चंद्रकांत वानखडे मार्गदर्शन करणार असून १२ ते १२.३० यावेळेत प्रश्नोत्तरे होणार आहेत. २ ते ५ या वेळेत ”अजूनही जिवंत आहे गांधी’ या अजय कांडर यांच्या दीर्घ कवितेवर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई भूषवणार असून वक्ते म्हणून नवनाथ तुपे, मुकुंद कुळे, संपत देसाई, सुशील धसकटे, अजय कांडर मार्गदर्शन करतील. ६ ते ८ यावेळेत “गांधीजींच्या वाटेवरचा प्रवास” यावर निरंजन टकले मार्गदर्शन करतील. ८ ते ८.३० चर्चा होणार आहे. २९ जानेवारी २०२३ रोजी १०.०० ते ११.३० गांधीजी आणि संविधान यावर प्रमोद चुंचूवार बोलणार असून ११.३० ते १२ प्रश्नोत्तर, १२ ते १ गांधी गारूड – संजीवनी खेर २ ते ३ दक्षिण कोकणात गांधी- डॉ. राजेंद्र मुंबरकर, ३ ते ४.३० : गांधी आणि समाजवाद – सुभाष वारे, ४.३० ते ५ समारोप होणार आहे. तरी या शिबिरात मोठ्या प्रमाणात जिज्ञासूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी लक्ष्मीकांत खोबरेकर मोबा. 9422946212 यांच्याशी संपर्क साधावा.