पंतप्रधान मोदींची संकल्पना ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कणकवलीत विद्यार्थ्यांशी “संवाद”
कणकवली तालुक्यात तीन ठिकाणी राणेंचे मार्गदर्शन वर्ग
कणकवली I मयुर ठाकूर :
देश महासत्ता बनविण्यासाठी तसेच देशाची प्रगती करण्यासाठी मुख्य आधार ठरणारा घटक म्हणजे आजचा शालेय विद्यार्थी… ! त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन आपण काय केलं, आपली परिस्थिती काय होती, आपण कसे घडलो, याबाबत प्रत्येक मंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी कणकवलीत तीन ठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढविणे या विषयावर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
कणकवली तालुक्यातील एस. एम. हायस्कूल सह नांदगाव आणि कासार्डे येथे ना. राणे यांनी विद्यार्थी वर्गाशी संवाद साधला. एस. एम. हायस्कूलमध्ये त्यांनी सकाळी ११.३० वा भेट देऊन “व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढविणे” आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मंत्री नारायण राणे यांनी आपण लहान असल्यापासूनचा प्रसंग सांगितला. आपले वडील देखील शेती करायचे. ६ वी. मध्ये असताना वडील मुंबईला मामाजवळ ठेऊन आले. त्यावेळी वृत्तपत्र देखील टाकायचे. छोटी – मोठी काम करूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मात्र प्रचंड मेहेनत, इच्छाशक्ती, जिद्द – चिकाटी, वाचन, अभ्यास असली तरच सगळं काही शक्य असल्याचं देखील राणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. तसेच शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन नोकरी शोधत बसू नये तर त्या पलीकडे देखील काय शिक्षण आहे याच देखील मुलांना मार्गदर्शन करावं. आपल्या जिल्ह्यात कलेक्टर एक महिला आहेत, त्यांच मार्गदर्शन घडवून मुलांना योग्य दिशा दाखवा. मुलांना बोलते करा. लाजू नका स्पष्ट बोला मनात काही ठेऊ नका जे आहे ते स्पष्ट बोलून उज्वल भवितव्य घडवा. जिल्हयातील अनेक महिला उद्योजक, IPS, CEO, शिक्षक झाल्या आहेत. त्यांचा आदर्श घ्या आणि त्यांच्या माध्यमातून दिशा ठरवा. मदत लागली तर हक्काने हाक द्या मी नेहेमीच तुमच्यासोबत राहीन. कारण आपणही अशाच परिस्थितीतून घडलो असल्याचे देखील मंत्री राणे यांनी सांगितले.
पुढे बोलताना मंत्री नारायण राणे म्हणाले, परीक्षेला जाताना मी फक्त पास होईन, एवढाच विचार करून परीक्षा देऊ नका. माझा विद्यार्थी हा भविष्यातील नागरिक आहे. तो कोणीतरी बनायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी कशा प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे, या उद्देशाने मी पाहत असतो. परजिल्ह्यातील व्यक्ती आपल्या जिल्ह्यात आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनियर होऊन सेवा बजावत असतील तर, आपण का नाही तसं करू शकत? हा प्रश्न आपल्या मनाला विचारला पाहिजे. आपलं आत्मपरीक्षण करून पहा. आपल्याला काय मिळत नाही, काय मिळतंय आणि त्याचा किती वापर आपण करत आहोत. कोकणात जन्मलेल्या माणसाला विकास कामात प्रगतीच्या दिशेने जाताना मर्यादा येताच कामा नये. मुळात मर्यादा येऊच नये. परीक्षेला जाताना मी फक्त पास होईन याच उद्देशाने जाऊ नका तर, मी ९५ ते १०० % मार्क मिळवू शकेन आणि माझं पुढील भवितव्य घडवीन या विचाराने विचार करून पावले उचलली पाहिजेत. आई – वडिलांनी काम केलं, कष्ट केले आणि आपण कमी का पडतो ? याचा विचार करा आणि अभ्यासाचे पाऊल उचलताना सक्षम होण्यासाठी मी पुढे कोण होणार ? मी पुढे कोण बनणार ? मला काय करायचं आहे ? असे प्रश्न मानला विचारा आणि पुढील पाऊले उचला, असे वडीलांप्रमाणे मार्गदर्शन देखील मुलांना केलं.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना मार्गदर्शन करून झाल्यावर मंत्री नारायण राणे यांनी मुलांशी संवाद साधला. काही मुलांना उभं करून नाव, गाव, घरची परिस्थिती, त्यांना पुढे शिकून काय करायचं आहे, त्यांची स्वप्न काय आहेत याची माहिती घेतली. व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढविणे कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मैत्री करा पण ती चांगल्या व्यक्तींशी करा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कट्ट्यावर बसून टवाळक्या करण्यापेक्षा आपलं आयुष्य घडवण्यासाठी जे आवश्यक आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारचं मार्गदर्शन मंत्री राणे यांनी विद्यार्थ्यांना केलं.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आम. राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी, एस. एम तायशेट्ये, डी. एम. नलावडे. सौ. वायंगणकर, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष आण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, एस. एम. हायस्कूल चे श्री. कांबळे व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.