रस्ता कामावरून ठाकरे गट आणि भाजपा लोकप्रतिनिधी आमने – सामने !
उपसरपंचाकडून धक्काबुक्की झाल्याची ग्रा. पं. सदस्याची तक्रार
मालवण : कुंभारमाठ मधील रस्ता कामावरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा लोकप्रतिनिधी आमने सामने आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे युवा ग्रा. पं. सदस्य राहुल प्रमोद परब यांच्या तक्रारीवरून उपसरपंच जीवन भिवा भोगांवकर (वय – ६०) यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण शहरा नजिक कुंभारमाठ जरीमरी नजिक रस्त्याचे नूतनीकरण हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ठाकरे गटाचे ग्रा. पं. सदस्य राहुल परब यांनी अलीकडे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे हे काम सुरु झाल्यानंतर राहुल परब याठिकाणी बांधकाम अधिकाऱ्यांसोबत पाहणी करीत होते. त्यावेळी उपसरपंच जीवन भोगावकर हे काहीही कारण नसताना अंगावर धावून आले व धक्काबुक्की केली, अशी तक्रार राहुल परब यांनी पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करीत आहेत.