साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर “धिंगाणा” ; स्थानिक महिलांना जबर मारहाण
स्थानिक संतप्त ; मात्र पर्यटकांच्या माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा
पोलीस ठाण्यात राजकीय पदाधिकाऱ्यांची गर्दी ; पदाधिकाऱ्यांकडून संयमाची भूमिका
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील ४० ते ४४ पर्यटकांच्या ग्रुपने ५ रुपयांच्या छुल्लक करावरून धिंगाणा घातल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर येणाऱ्या पर्यटकांकडून ५ रुपयांचा कर आकारला जातो. त्यानुसार याठिकाणच्या महिला कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांकडून कराची रक्कम मागितल्याच्या रागातून या पर्यटकांमधील महिलांनी स्थानिक महिला कर्मचाऱ्यांना जबरी मारहाण केली. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर स्थानिकांबरोबरच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येथे गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणावर माफीनाम्याने पडदा टाकण्यात आला. मात्र या घटनेनंतर बेशिस्त पर्यटकांना आवर घालायचा कसा ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मालवणात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असून येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला पर्यटकांची पसंती दिसून येत आहे. किल्ल्याच्या स्वच्छतेसह अन्य मूलभूत सुविधांसाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायती कडून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर प्रतिव्यक्ती पाच रुपयांचा अभ्यागत कर आकारला जातो. याकरिता ग्रामपंचायतीच्या वतीने दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातारा येथील ४० ते ४४ पर्यटकांचा एक ग्रुप सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांकडून अभ्यागत कराची मागणी केली असता या पर्यटकांनी स्थानिक महिलांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. आम्ही कर भरणार नाही, असे सांगून हा पर्यटकांचा ग्रुप किल्ला फिरण्यासाठी पुढे गेला. याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीला माहिती दिल्यानंतर पर्यटक वाद घालत असतील तर वादविवाद वाढवण्यापेक्षा त्यांच्याकडून कर घेऊ नका, अशी सूचना ग्रा. पं. च्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मात्र काहीवेळाने हे पर्यटक माघारी आले आणि त्यांनी पुन्हा या महिला कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढून या पर्यटकांमधील महिलांनी स्थानिक महिला कर्मचाऱ्यांना मारहाण सुरु केली. तब्बल १० ते १५ मिनिटे ही मारहाण सुरु होती. त्यानंतर किल्ल्यावरील नागरिकांनी मध्यस्थी करून स्थानिक महिलांना बाहेर काढले.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील महिला कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या ग्रुप कडून मारहाण झाल्याचे समजतात स्थानिक नागरिक आक्रमक झाले. हे सर्वजण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर या पर्यटकांना पोलीस ठाण्यात आणण्याची मागणी त्यांनी केली. काही वेळाने यातील काही पर्यटक पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर स्थानिक आणि पर्यटकांच्या ग्रुपमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सदरील महिला पर्यटकांनी मारहाण झालेल्या स्थानिक महिलांची माफी मागावी, तसेच या पर्यटकांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांचा मोबाईल फोडल्याने सदरील रक्कम सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याला पर्यटकांकडून संमती दर्शवण्यात आल्यानंतर माफीनाम्याने या प्रकारावर पडदा टाकण्यात आला.