वायरी भुतनाथ गावातील रिक्त पोलीस पाटील पद भरा…

सरपंच भगवान लुडबे यांच्यासह ग्रामस्थांची मालवण महसूल प्रशासनाकडे मागणी

मालवण : सुमारे २,८९२ लोकवस्ती असलेल्या वायरी भुतनाथ गावात गेली २० वर्षे पोलीस पाटील पद रिक्त आहे. दाखले व अन्य कामांबाबत ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तरी गावातील पोलीस पाटील पद भरण्यात यावे. अशी मागणी सरपंच भगवान लुडबे, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या वतीने मालवण महसुल प्रशासनाकडे गुरुवारी करण्यात आली. याबाबत निवेदन नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांना देण्यात आले.

यावेळी उपसरपंच प्राची माणगांवकर, पांडुरंग मायनाक, चंदना प्रभू, तेजस लुडबे, ममता तळगावकर आदींसह हरी खोबरेकर, माजी सरपंच साक्षी लुडबे, माजी उपसरपंच मयु लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, मंदार लुडबे, चंद्रकांत प्रभू, निलेश लुडबे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

वारस तपास करणे, उत्पन्नाचे दाखले काढणे, जातीचे दाखले तसेच अन्य दाखले बनविण्यासाठी पोलीस पाटील यांच्या दाखल्याची आवश्यकता असते. सध्या वायरी-भुतनाथ गावचा पोलीसपाटील पदाचा पदभार देवबाग पोलीस पाटील भानुदास येरागी यांचेकडे आहे. त्यामुळे या गावचे लोक दाखल्यासाठी देवबाग गावात जाणेसाठी ८ किमी लांब असा १६ किमीचा जाता-येता प्रवास करून दाखला मिळवतात. तसेच वायरी भूतनाथ गावात एखादी अप्रिय घटना घडल्यास पोलीस पाटील नसल्याने पंचयादी होण्यासही विलंब होतो. तरी या सर्व समस्यांचा विचार करता लवकरात लवकर पोलीस पाटील पद भरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!