मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या धडाकेबाज कारवाईचं “मनसे” कौतुक
शासकीय अधिकाऱ्यांना धमकी, दमदाटी केल्यास मनसे त्यांचा “बंदोबस्त” करेल : अमित इब्रामपूरकर यांचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू, चिरा व्यवसायावर महसूल विभागाने पंधरा दिवसापासून कारवाईचा बडगा उगारला आहे . दिखावू कारवाई न करता आरटीओ तसेच संबंधिताना नोटीसा देत प्रत्यक्ष कृतीने पाठपुरावा करणाऱ्या मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांचा मनसेच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी तहसीलदार पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अनधिकृत व्यवसायाला आमचा विरोध असुन प्रशासनाच्या कारवाई वेळी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना वाळूमाफियांनी धमकी,दमदाटी अंगावर धावून जाणे असे प्रकार केले तर मनसेच्या पद्धतीने बंदोबस्त करण्याचा इशारा देण्यात आला.
गेले अनेक दिवस तालुक्यात अनधिकृत वाळूव्यवसाय होत असताना रोज १३५ ते १५० डंपर ये-जा करत होते. बेळणे आचरा येथे अनधिकृत चिरा वाहतुकीवर तसेच देवली येथे अनधिकृत वाळूचा साठा नेण्यासाठी आलेले २८ डंपर महसूल विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले होते. लपवून ठेवलेला आणखी ८० ब्रास वाळूसाठा देखील महसूल विभागाने जप्त केला. वाळु माफियाना न जुमानता पोलिसांच्या सहकार्याने मध्यरात्रीपासून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत होती. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल मनसेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे माजी तालुका सचिव विल्सन गिरकर, माजी तालुकाध्यक्ष रामनाथ पराडकर, प्रशांत पराडकर, नितीन खानोलकर आदी उपस्थित होते.