मालवणात तहसीलदारांचा धडाका सुरूच ; कांदळगावात ३० ब्रास अनधिकृत वाळूसाठा हस्तगत
मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन, वाहतूक व वाळू साठा यावर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात धडक कारवाई सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी कांदळगाव सडा या ठिकाणी अनधिकृत वाळू साठा महसूल पथकाने सील केला.
पंचनामा व प्राथमिक तपासणीत हा वाळूसाठा ३० ब्रास असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे. पंचांसमोर वाळू साठा सील करून कांदळगाव पोलीस पाटील यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. तर जमीन मालक यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही मंगळवारी केली जाणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.