वैभववाडी तालुक्यात ८ सप्टेंबर पासून वारस तपास नोंदणी शिबिराचे आयोजन
२१ सप्टेंबर पर्यंत चालणार शिबीर : जमीन वारसांनी लाभ घेण्याचे तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी)
वैभववाडी तालुक्यात ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान वारस हक्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत आपल्या जमिनीच्या वारस हक्क प्रकरणी तपास करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह गावचे तलाठी यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.
वारस तपास नोंदणीचे गावपातळीवर शिबिराचे आयोजन बाबत वैभववाडी तालुक्यातील गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठी यांचे कडील फेरफार नोंदवही मधील धारण केलेल्या या जमिनीवर निर्माण झालेल्या हक्कांची किंवा बदलीचे संक्षिप्त वर्णन या नमुन्यात नोंद नोंदवायची असते. जमिनीमध्ये होणारे हक्क बदल हे प्रामुख्याने खरेदी-विक्री व्यवहार ,जमिनीची वाटणी ,गहाणखत, हक्कसोडपत्र, वारस हक्क बक्षीस पत्रे, दत्तक पत्र, कर्ज, विहिरींची नोंद, भूसंपादन व नोंदणी वहिवाटीच्या नोंदी केल्या जातात. सातबारा उतारा व इतर अभिलेखात होणारे फेरबदल व त्याबाबत उपाययोजना संदर्भात शासन निर्णयानुसार सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने गणेश चतुर्थी सणानिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. या कालावधीत विशेष बाब म्हणून वारस हक्क प्रकरणी वारस तपास नोंदणीचे शिबिर आयोजित करून खातेदारांचे प्रश्न निकाली काढण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी दि. ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर पर्यंत वारस तपास नोंदणीचे गाव निहाय विशेष शिबिर आयोजित करण्यात येत आहे. जमिनीच्या वारस हक्क प्रकरणी तपास करण्यासाठी या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार झळके यांनी केले आहे.