सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ज्यादा व्याजदराची धनवृध्दी विशेष ठेव योजना
बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते ओरोस येथे शुभारंभ
एका दिवसात कसाल शाखेने गोळा केली एक कोटी रुपयांची ठेव ; अध्यक्षांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ठेवीदारांसाठी नववर्षाची भेट म्हणून २ जानेवारी २०२३ पासून जादा व्याजदराची धनवृध्दी विशेष ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ सोमवारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते बँकेचे प्रधान कार्यालय, ओरोस येथे करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, समीर सावंत, श्रीम. नीता राणे, विठ्ठल देसाई, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँक अधिकारी, कसाल शाखेचे व्यवस्थापक विजय शृंगारे, श्रीम. रजनी कदम, ठेवीदार यावेळी उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी कसाल शाखेने एका दिवसात सुमारे १ कोटी ठेव गोळा केली असुन ठेव प्रमाणपत्र बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व बँक संचालक यांचे हस्ते ठेवीदारांना यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील ग्राहक व ठेवीदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दाखवलेल्या विश्वासा बद्दल अध्यक्ष मनीष दळवी यांनी आभार मानले असून असाच विश्वास ग्राहक व ठेवीदारांनी कायम बँकेवर ठेवावा. सर्व आर्थिक व्यवहार आमच्या बँके मार्फत करावेत. तसेच सिंधु धनवृध्दी ठेव योजनेत जिल्हा वासियानी सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी केले.