युवा सेनेच्या इशाऱ्यानंतरच देऊळवाडा – कोळंब सागरी महामार्गाचे काम सुरु !
सा. बां. विभागाकडून मिळालेल्या पत्रानंतर स्पष्टोक्ती ; रस्तारोको मागे घेण्याची पत्रात विनंती
मालवण : मालवण शहर तसेच तालुक्यातील अनेक विकासकामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी कार्यकाळात मंजूर झाली. अनेक कामे पूर्णही झाली. शहरातील देऊळवाडा ते कोळंब पुल या सागरी महामार्गाचे डांबरीकरण कामही आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून आघाडी सरकारमध्ये मंजूर झाले. मात्र ठेकेदार एजन्सीच्या दिरंगाईमुळे काम सुरू झाले नाही. बांधकाम विभागही काम करून घेण्यास असमर्थ ठरला. यासगळ्याचा परिणाम म्हणून सागरी महामार्ग अधिकच खड्डेमय बनला. यामुळे मालवण युवासेनेच्या माध्यमातून बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनास निवेदन देत तात्काळ रस्ताकाम सुरू न झाल्यास ३ जानेवारी रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली.
सागरी महामार्ग डांबरीकरण काम मंजूर झाल्यानंतर कार्यारंभ आदेश नंतर कामास १२ महिने मुदत असल्याचे व पावसाळा कालावधी मुळे काम सुरू झाले नव्हते. आता काम सुरू करण्यात आले असून काम सुस्थितीत करण्यात येईल. तरी आपले रास्ता रोको आंदोलन स्थगित करून शासनास सहकार्य करावे. असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी मालवण युवासेना पदाधिकारी सिद्धेश उमेश मांजरेकर यांच्या नावे दिले.
हे पत्र पाहता ठेकेदारामुळे रास्ताकाम रखडले. तर युवसेनेच्या रास्ता रोको आंदोलन इशाऱ्यामुळे सागरी महामार्ग डांबरीकरण काम सुरू झाले आहे. हे बांधकाम विभागाच्या पत्रातूनच स्पष्ट होते. अशी भूमिका मालवण युवासेना पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर यांनी स्पष्ट केली आहे.
मालवण तालुक्यात अनेक रास्ताकामे आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून आणली त्यापैकी अश्याच पद्धतीने काही रस्ते ठेकेदार यांनी पूर्ण केले नाहीत. ती रस्ताकामे पूर्ण होण्यासाठीही युवासेना प्रसंगी आंदोलन छेडेल. असा इशाराही मालवण शहर युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.